महामार्ग दुरूस्तीच्या कामाला केंद्राची मंजूरी
By Admin | Updated: September 27, 2015 02:05 IST2015-09-27T02:05:09+5:302015-09-27T02:05:09+5:30
नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातची दुरूस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे.

महामार्ग दुरूस्तीच्या कामाला केंद्राची मंजूरी
भावना गवळी : वडकीतील उड्डाण पूल रद्द
यवतमाळ : नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातची दुरूस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. सोबतच ग्रामस्थांसाठी अडचणीचा ठरू शकणारा वडकी येथील उड्डाण पूलही रद्द झाल्याची माहिती खासदार भावना गवळी यांनी येथे दिली.
महामार्गावरील पाटणबोरी ते हिंगणघाटदरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला.
लहान-मोठे अपघातही नित्याची बाब झाली आहे. ही बाब ना. गडकरी यांच्या निदर्शनास आणून देत सदर कामाला मंजुरी मिळवून घेतल्याचे खासदार गवळी यांनी सांगितले.
तसेच उड्डाण पूल झाल्यास वडकी हे गाव दोन भागात विभागले जाऊ लागले. निवासी आणि शेतजमिनीचे नुकसान या पुलामुळे होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. ही बाबही ना. गडकरी यांच्याकडे मांडण्यात आली. त्यांनी सदर काम रद्द केले.
पाटणबोरी-हिंगणघाट रस्ता दुरूस्तीच्या कामाला मंजूरी मिळाल्यामुळे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होईल असे खासदार भावना गवळी यांनी सांगितले. (वार्ताहर)