शतकोटीतील वृक्षांचा पंचनामा
By Admin | Updated: August 22, 2014 00:07 IST2014-08-22T00:07:44+5:302014-08-22T00:07:44+5:30
शतकोटी वृक्ष लागवड योजनेत आतापर्यंत लाखो झाडे लावल्याचे दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र या वृक्षलागवडीचे मूल्यमापनच झाले नाही. २०११ पासून लावण्यात आलेल्या वृक्षापैकी प्रत्यक्षात किती

शतकोटीतील वृक्षांचा पंचनामा
२५० शाळा : १५ सप्टेंबरपर्यंत मोहीम
यवतमाळ : शतकोटी वृक्ष लागवड योजनेत आतापर्यंत लाखो झाडे लावल्याचे दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र या वृक्षलागवडीचे मूल्यमापनच झाले नाही. २०११ पासून लावण्यात आलेल्या वृक्षापैकी प्रत्यक्षात किती जीवंत आहे, याचा पंचनामा गावपातळीवर करण्यात येणार आहे. ही मोहीम २५ आॅगस्टपासून हाती घेतली जाणार आहे.
जिल्ह्यातील अडीचशे शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून ही पडताळणी केली जाणार आहे. या कामी राष्ट्रीय हरितसेना लावण्यात येणार आहे. व्हीआर पॅटर्ननुसार वृक्षांची लागवड झाली की नाही. कार्यक्रम राबविताना प्रत्यक्षात किती वृक्षांची लागवड झाली आणि आज जीवंत असलेले वृक्ष याचे थेट वृक्षारोपण झालेल्या जागेवर जाऊन पाहणी केली जाणार आहे. एक प्रकारे या योजनेतील अपहार उघड करण्याचा हा प्रयत्न आहे. वृक्ष लागवडीच्या योजना कागदावरच राबविल्या जातात. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र याची उलट तपासणी शासनस्तरावरून झाली नाही. त्यामुळे लावलेल्या झाडांपैकी प्रत्यक्ष जीवंत किती याचा कुठलाही आकडा यंत्रणेजवळ उपलब्ध नाही. त्यामुळेच जिल्हास्तरावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक या समितीचे सचिव आहे. तर रोहयो उपजिल्हाधिकारी, उपमुख्याधिकारी पंचायत हे या समितीचे सदस्य आहे.
या मूल्यमापनासाठी सर्वांनाच प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक गावातून जीवंत वृक्षांची माहिती गोळा केली जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय हरितसेनेत काम करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. २०११-१२, २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षांमध्ये लागवड केलेले वृक्ष आणि आज त्यापैकी जीवंत असलेले वृक्ष याचा हा सर्वे आहे. विशेष म्हणजे ही मोहीम राबविताना संबंधित यंत्रणेकडून निकषांंचे पालन करण्यात आले की नाही, याचीही पडताळणी केली जाणार आहे. हा कार्यक्रम १५ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर दर्शनी भागातच वृक्ष लागवड केली आहे. त्यानंतर आकडे फुगवून केवळ कागदोपत्रीच हा कार्यक्रम उरकण्यात आला आहे. आता या वृक्ष लागवडीची उलट तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये शतकोटी वृक्ष लागवड योजनेतील बोगसपणा उघड होणार आहे. आजपर्यंत दिशाभूल करणारी आकडेवारी दाखविल्याबद्दल कुणावरही कारवाई झालेली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)