जिल्हाभर ईद उत्साहात साजरी
By Admin | Updated: July 8, 2016 02:22 IST2016-07-08T02:22:07+5:302016-07-08T02:22:07+5:30
जिल्ह्यात ठिकठिकाणी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी अमन, शांती आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली.

जिल्हाभर ईद उत्साहात साजरी
यवतमाळ : जिल्ह्यात ठिकठिकाणी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी अमन, शांती आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. ईदची नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यवतमाळ शहरातील कळंब चौक स्थित इदगाह मैदानावर सकाळी ९.१५ वाजता ईदची नमाज अदा करण्यात आली. जामा मशिदीचे इमाम मौलाना मुमताज अली यांनी हा नमाज अदा केला. यावेळी त्यांनी भाईचारा, प्रेम, सद्भावना जोपासण्याचा सल्ला दिला. चाँदरात्री जकात म्हणून गोळा झालेल्या पैशातून धान्य, मेवा, कपडे आणि फळासह ईदचे साहित्य गरजवंतांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात आले. यावेळी लोकसहभागातून गोळा झालेले गहू गरजवंतांच्या घरापर्यंत पोहोचते करण्यात आले.
ईदचा नमाज अदा झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण केली. कळंब चौकात सर्वधर्मीय नागरिकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस विभागाच्यावतीने गुलाब पुष्प देऊन मुस्लीम बांधवांचे स्वागत करून त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. इदगाह मैदानासोबतच ताहेरनगर, अलरजा मशीद, गौसिया मशीद, जामा मशीद, कोहिनूर सोसायटी आणि वडगाव येथेही ईदची नमाज अदा करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, महागाव, आर्णी, नेर, कळंब, बाभूळगाव यासह विविध मशिदीमध्ये नमाज अदा करण्यात आल्या. दिवसभर ईदनिमित्त उत्साह दिसत होता. ईदनिमित्त सर्वधर्मीय नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शुभेच्छा देत होते. अमन, शांती आणि सुख समृद्धीसाठी सर्वांनीच प्रार्थना केली. (शहर वार्ताहर)