सीसीटीव्हीने हेरले अट्टल चोरटे
By Admin | Updated: August 1, 2015 03:40 IST2015-08-01T03:40:13+5:302015-08-01T03:40:13+5:30
येथील श्रीकृष्ण सोसायटीत झालेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सीसीटीव्हीने हेरले अट्टल चोरटे
दोघे पोलिसांच्या ताब्यात : श्रीकृष्ण सोसायटीतील धाडसी घरफोडी
यवतमाळ : येथील श्रीकृष्ण सोसायटीत झालेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्या वर्णनावरून स्थानिक गुन्हे शोध पथकाने या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे
शहरातील सर्वच भागात सातत्याने घरफोडीच्या घटना होत आहे. सर्वच घटनांमध्ये चोरीची पध्दत सारखीच आहे. चोरटे सायंकाळच्या सुमारास येतात. विशेष म्हणजे ठराविक वेळेत घर बंद होते, याची पुुरेपूर माहिती ठेवूनच हा गुन्हा केला जात आहे. हँडग्लोज घालून चोरी करण्यात येत आहे. त्यामुळे ठसे तज्ज्ञालाही पाचारण करून फायदा होत नाही. याच पध्दतीने श्रीकृष्ण नगरातील अशोक गांधी यांच्याकडे घडफोडी करण्यात आली. यावेळी चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांच्या वर्णनावरून पोलिसांनी रात्रीच शोध मोहीम सुरू केली. दोन संशयीत सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली नाही. यातील एकाच्या शिरावर चोरीचे अनेक गुन्हे आहेत. वर्धा जिल्ह्यातही त्यांने घरफोड्या केल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. तसेच दुसऱ्याच्या शिरावर दिग्रस पोलिस ठाण्याच्या हद्दीत शस्त्राच्या धाकावर लुटल्याचा आरोप आहे. या संशयितांना कबुली दिल्यानंतरही मुद्देमाल हस्तगत करण्याची अडचण त्यांच्या पुढे येणार आहे. याशिवाय इतर पाच ते सात संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. यात पोलिसांना कितपत यश येते याकडे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)