जिल्हा क्रीडा कार्यालयात लागले सीसीटीव्ही कॅमेरे
By Admin | Updated: October 12, 2015 02:36 IST2015-10-12T02:36:05+5:302015-10-12T02:36:05+5:30
गौरीपूजनाच्या दिवशी येथील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षात चक्क मद्यपींनी ओली पार्टी झोडली.

जिल्हा क्रीडा कार्यालयात लागले सीसीटीव्ही कॅमेरे
यवतमाळ : गौरीपूजनाच्या दिवशी येथील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षात चक्क मद्यपींनी ओली पार्टी झोडली. तोडफोड केली होती. एवढेच नव्हे तर या कक्षातील सीपीयूसुद्धा चोरून नेला होता. हा प्रकार पोलिसात पोहचल्यानंतर आता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेऊन तातडीने ते लावण्यात आले आहे.
तीन कॅमेरे प्रवेशद्वार, एक जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षात आणि एक कर्मचाऱ्यांच्या कक्षात अशाप्रकारे कॅमेरे तीन दिवसांपूर्वीच बसविण्यात आले आहेत. धूमाकूळ घालणाऱ्यांवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून काय कारवाई करण्यात आली आणि धूमाकूळ घालणारे कोण, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात असून मद्यपींना खुद्द जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून संरक्षण देण्याचे कारण कळायला मार्ग नाही. नाही म्हणायला पोलीस तक्रार झाली आहे. परंतु ठोस कारवाई मात्र होताना दिसत नाही.
येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपये अनुदानाच्या योजना राबविल्या जातात. यासाठी बरेचदा कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसते. यातूनच चक्क क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षासह परिसरात ओल्या पार्ट्याही रंगतात. सप्टेंबर महिन्यात अशीच एक पार्टी रंगली होती. कार्यालयातीलच कर्मचाऱ्यांची ही पार्टी होती. यथेच्छ मदिरा प्राशन केल्यानंतर झालेल्या वादातून कक्षातील संगणक व केबलची तोडफोड करण्यात आली शिवाय जाताना सीपीयूसुद्धा नेण्यात आला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तेंव्हा तोडफोड व दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी जोर धरू लागली होती. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी ८ आॅक्टोबरला पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. (क्रीडा प्रतिनिधी)