‘सीसीआय’ची चौकशी अंतिम टप्प्यात, अहवालाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 07:00 IST2020-06-25T07:00:00+5:302020-06-25T07:00:08+5:30

‘लोकमत’ने सीसीआयमधील कापूस खरेदी घोटाळा उघडकीस आणला. मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्या नेतृत्वात या घोटाळ्याची चौकशी करण्यात आली. यात नेमक्या किती केंद्रांवर घोटाळा आढळला, काय-काय निष्पन्न झाले याकडे नजरा लागल्या आहे.

CCI inquiry in final stage, report awaited | ‘सीसीआय’ची चौकशी अंतिम टप्प्यात, अहवालाची प्रतीक्षा

‘सीसीआय’ची चौकशी अंतिम टप्प्यात, अहवालाची प्रतीक्षा

ठळक मुद्देकापूस खरेदी घोटाळाराज्यात ८६ केंद्र, बहुतांश संशयाच्या भोवऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सीसीआयमधील (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) कोट्यवधी रुपयांच्या कापूस खरेदी घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात असून त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
‘लोकमत’ने सीसीआयमधील कापूस खरेदी घोटाळा उघडकीस आणला. त्याची दखल घेऊन मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांच्या नेतृत्वात राज्यातील या घोटाळ्याची चौकशी करण्यात आली. पानीग्रही यांनी यवतमाळ, वर्धा, नागपूरसह विविध जिल्ह्यात भेटी देऊन चौकशी केली. अनेक ठिकाणी नमुने घेतले, रेकॉर्ड ताब्यात घेतले, गोदामातील गाठींचे वजन तपासले. राज्यातील अनेक केंद्रांना भेटी दिल्या. सीसीआयची ही चौकशी अंतिम टप्प्यात असून मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी.के. अग्रवाल यांच्याकडे अहवाल सादर होण्याची प्रतीक्षा आहे. या चौकशीत नेमक्या किती केंद्रांवर घोटाळा आढळला, काय-काय निष्पन्न झाले याकडे नजरा लागल्या आहे.

विदर्भात ३३ केंद्रांवर कापूस खरेदी
सीसीआयने यंदाच्या हंगामात राज्यात एकूण ९० कापूस खरेदी केंद्र मंजूर केले होते. त्यापैकी ८६ केंद्रांवर प्रत्यक्ष कापूस खरेदी करण्यात आली. सीसीआयचे विदर्भातील मुख्यालय अकोल्यात असून त्याअंतर्गत ३३ केंद्रांवर कापूस खरेदी झाली. राज्यात ८६ पैकी बहुतांश केंद्र तेथील वादग्रस्त कापूस खरेदीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

विविध मार्गाने केला घोटाळा
शेतचा कापूस सदोष असल्याचे सांगून नाकारणे, नंतर तोच कापूस व्यापाऱ्यांनी आणल्यास स्वीकारणे, रूईमध्ये अधिक घट दाखविणे, कमी दर्जाचा कापूस उच्च दर्जाच्या कापसात मिसळविणे, रूईगाठींचे अतिरिक्त वजन दाखविणे अशा विविध मार्गाने हा घोटाळा केला गेला. सीसीआयचे ग्रेडर्स आणि जिनिंग-प्रेसिंग मालकांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लूट व सीसीआयमध्ये हा घोटाळा झाला. या घोटाळ्याला कुण्या वरिष्ठाचे पाठबळ आहे का, याचीसुद्धा चौकशी केली जाणार आहे.

‘सीसीआय’ कायम नफ्यात
गेल्या अनेक वर्षांपासून सीसीआय कापसाची खरेदी करीत असून कायम नफ्यात आहे. विविध स्तरावर असलेली तपासणी यंत्रणा हे यामागील कारण आहे. या यंत्रणेमुळे घोटाळ्याला फारसा वाव राहत नसल्याचा दावा सीसीआयने केला आहे.

चौकशी पूर्णत्वाकडे असून ताब्यात घेतलेल्या रेकॉर्डची तपासणी केली जात आहे. ती होताच अहवाल सादर केला जाईल.
- एस.के. पानीग्रही
चौकशी अधिकारी तथा मुख्य महाव्यवस्थापक, सीसीआय, मुंबई.

Web Title: CCI inquiry in final stage, report awaited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस