‘सीसीएफ’लाही अहवालाची प्रतीक्षा

By Admin | Updated: April 16, 2015 00:58 IST2015-04-16T00:58:46+5:302015-04-16T00:58:46+5:30

यवतमाळ व पांढरकवडा वनविभागांतर्गत झालेली अवैध वृक्षतोड, त्यासाठी वापरण्यात आलेले बोगस हॅमर,

'CCF' also waiting for the report | ‘सीसीएफ’लाही अहवालाची प्रतीक्षा

‘सीसीएफ’लाही अहवालाची प्रतीक्षा

अवैध वृक्षतोड : बोगस हॅमरचा वापर, फितूर वन अधिकारी निशाण्यावर
यवतमाळ :
यवतमाळ व पांढरकवडा वनविभागांतर्गत झालेली अवैध वृक्षतोड, त्यासाठी वापरण्यात आलेले बोगस हॅमर, संशयास्पद वाहतूक पास, फितूर वन अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग यातील चौकशीच्या अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. खुद्द यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे हेसुद्धा या अहवालाकडे नजरा लावून आहेत.
यवतमाळचे उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा (आयएफएस) या नॉनकरप्ट अधिकाऱ्याकडे अवैध वृक्षतोडीची चौकशी असल्याने आणि अनेक ठिकाणच्या लाकूड जप्तीचे ते प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने यावेळी पहिल्यांदाच ‘वास्तव’ रेकॉर्डवर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी अनेक चौकशा झाल्या. मात्र चौकशी करणारेही मॅनेज झाल्याने सागवान तोडीची डझनावर प्रकरणे दडपली गेली. यावेळी मुख्य वनसंरक्षकांनी मोठ्या विश्वासाने ही चौकशी लाकरा यांच्याकडे दिली आहे. या चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वनखात्यात राहून खात्याशीच बेईमानी करणाऱ्या फितूर अधिकाऱ्यांचा किमान यावेळी तरी पर्दाफाश होतो का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आतापर्यंत सर्वच जंगलात मोठ्या प्रमाणात सागवान तोड झाली. बेवारस स्थितीत लाकडे, वाहने जप्तही झाली.
मात्र त्याचा तपास तडीस गेला नाही. संशयास्पद प्रकरणात चौकशीही झाली. मात्र त्या ऐनवेळी ‘मॅनेज’ झाल्या. त्यामुळे चौकशी करणाऱ्यांवरचाही जणू विश्वास उडाला. मात्र लाकरा यांचा पारदर्शक कारभार पाहता यावेळी चौकशी मॅनेज होणार नाही, असा विश्वास वनवर्तुळात व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या चौकशी अहवालाची सर्वांनाच उत्सुकता आहे.
यवतमाळ व पांढरकवडा वनविभागांतर्गत कार्यरत अनेक वन अधिकारी-कर्मचारी सागवान तस्करांना शरण गेले आहेत. त्यामुळे हिरव्या वर्दीच्या साक्षीनेच सागवान तोड व तस्करी होत आहे. वन अधिकारीच त्यासाठी बोगस हॅमरची व वाहतूक पासची व्यवस्था करून देत आहे. मात्र यावेळी चौकशीत त्यांचा पर्दाफाश होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

पुसदमध्ये अखेर कमलाकर धामगे रुजू
सुमारे चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या पुसद येथील उपवनसंरक्षक पदावर अखेर नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील कमलाकर धामगे बुधवारी रूजू झाले. त्यांनी एस.एस. दहिवले यांच्याकडून प्रभार स्वीकारला. सुरेश आलूरवार सेवानिवृत्त झाल्यापासून ही जागा रिक्त होती. धामगे आयएफएस मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. धामगे यांच्यापुढे पुसद वनविभागातील सागवान तस्करी व वन्यप्राण्यांची शिकार रोखण्याचे, वन तपासणी नाके प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याचे आणि डबघाईस आलेला कारभार सुधारण्याचे आव्हान आहे.
पांढरकवडा विभागाची सूत्रे जी. गुरूप्रसादकडे
पांढरकवडा येथे उपवनसंरक्षक म्हणून भारतीय वनसेवेचे अधिकारी जी.गुरूप्रसाद रुजू झाले आहेत. तेथील डीएफओ गिऱ्हेपुंजे यांची बदली झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. थेट आयएफएस आणि नॉनकरप्ट असलेल्या गुरूप्रसाद यांची ही पहिलीच नियुक्ती आहे. रुजू होताच त्यांनी पांढरकवडा वनविभागातील अवैध वृक्षतोडीवर अंकुश लावण्याचे सूतोवाच केले. शिवाय बोगस हॅमर, बोगस वाहतूक पास, आंध्रात होणारी तस्करी, वन खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सागवान कंत्राटदारांशी असलेले मिलीभगत यावर गुरूप्रसाद यांचा वॉच राहणार आहे.

चौकशी अधिकारी प्रमोदचंद लाकरा यांच्याशी आजच बोललो, पुढील दोन दिवसात त्यांचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित केली जाईल.
- व्ही.व्ही. गुरमे
मुख्य वनसंरक्षक, यवतमाळ

Web Title: 'CCF' also waiting for the report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.