दारू पकडण्यासाठी आमदार रस्त्यावर
By Admin | Updated: September 7, 2015 02:17 IST2015-09-07T02:17:58+5:302015-09-07T02:17:58+5:30
पोलिसांना दारूबंदीसाठी दोन दिवसाचा अल्टीमेटम देऊनही उपयोग झाला नसल्याने रविवारी खुद्द आमदारच अवैध दारू पकडण्यासाठी शेकडो महिलांसह रस्त्यावर उतरले.

दारू पकडण्यासाठी आमदार रस्त्यावर
कळंबच्या महिला संतप्त : दारू विरोधी व दारू समर्थक आमने-सामने
कळंब : पोलिसांना दारूबंदीसाठी दोन दिवसाचा अल्टीमेटम देऊनही उपयोग झाला नसल्याने रविवारी खुद्द आमदारच अवैध दारू पकडण्यासाठी शेकडो महिलांसह रस्त्यावर उतरले. मात्र दारू विरोधी आणि दारू समर्थक आमने-सामने आल्याने दोनही गटांची समजूत घालून पुन्हा एकदा दोन दिवसात दारूबंदीचे आश्वासन देण्यात आले. तर पोलिसांना आजही महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
कळंब येथे दारूबंदी करावी या मागणीसाठी ४ सप्टेंबर रोजी शेकडो महिला पोलीस ठाण्यात धडकल्या होत्या. त्यावेळी राळेगावचे आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी दोन दिवसात दारूबंदीचा अल्टीमेटम पोलिसांना दिला होता. कळंबमध्ये दारूबंदी झाली नाही तर आपण स्वत: दारू पकडण्यासाठी रस्त्यावर उतरु असे सांगितले होते. मात्र दोन दिवसानंतरही कळंबमध्ये दारूबंदीसाठी कोणत्याच हालचाली झाल्या नाही. त्यामुळे महिला संतप्त झाल्या. शेकडो महिला तथागतनगरात एकत्र जमल्या. त्यावेळी आमदार डॉ. उईके त्या ठिकाणी उपस्थित झाले. महिलांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तेवढ्यात पोलीसही तेथे उपस्थित झाले. आमदार उईके यांना सोबत घेऊन संतप्त महिला व पुरुष दारू पकडण्यासाठी निघाले. तथागतनगरातून निघालेला हा मोर्चा तहसील चौकात पोहोचला. त्यावेळी दारू समर्थक बेड्यावरील नागरिक आक्रमक होऊन पुढे आले. दोनही गटात वाद होण्याची चिन्हे दिसू लागली. त्यावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने दंगल नियंत्रण पथकासह शहरात दाखल झाले. मात्र कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दुसरीकडून दारू विक्रेत्यांचा जमाव मोर्चेकऱ्यांवर लाठ्याकाठ्या घेऊन चालून आला. पोलिसांनी मध्यस्थी करीत त्यांना शांत केले. दोनही गट शांत झाल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा हाणामारी झाली असती.
त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. महिलांनी आपली कैफियत यावेळी पुन्हा मांडली. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मदने यांनी दारू विक्री परिसरात पोलिसांचा फिक्स पॉर्इंट लावण्याची हमी दिली. तसेच येत्या दोन दिवसात संपूर्ण दारू बंदी करण्याचे आश्वासन दिले. तर आमदार उईके यांनी पोलीस कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही, लोकभावनेचा उद्रेक होण्यापूर्वी पोलिसांनी दारूबंदीचा विषय गांभीर्याने घ्यावा, असा इशारा पोलिसांना आमदार उईके यांनी दिला. (तालुका प्रतिनिधी)