नगदीच्या तगाद्याने कास्तकारांची झाली कोंडी
By Admin | Updated: July 2, 2015 02:50 IST2015-07-02T02:50:33+5:302015-07-02T02:50:33+5:30
दरवर्षी उधारीवर बियाणे खरेदी करून पेरणी करणाऱ्या कास्तकारांची यंदा चांगलीच कोंडी झाली आहे.

नगदीच्या तगाद्याने कास्तकारांची झाली कोंडी
कृषी केंद्रांनी केली उधारी बंद : गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाने कृषी केंद्रचालक धास्तावले
यवतमाळ : दरवर्षी उधारीवर बियाणे खरेदी करून पेरणी करणाऱ्या कास्तकारांची यंदा चांगलीच कोंडी झाली आहे. बियाण्यांमध्ये फसवणूक झाल्यास कृषीकेंद्रचालकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे कृषीकेंद्र चालक उधारीत बियाणे देण्यास सपशेल नकार देत आहेत.
हलाखीशी लढत शेती करणाऱ्या कास्तकारांना उधारीत बियाणे घेण्याशिवाय पर्यायच नाही. पेरणीच्या काळात नेहमीच्या कृषीेकेंद्रातून उधारीवर बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करायची आणि शेतमाल विकल्यानंतर सर्व उधारी एकरकमी फेडायची, असा बहुतांश कास्तकारांचा शिरस्ता आहे. कृषीकेंद्रचालकही या व्यवहारात खूषच होते. कारण, ज्या कास्तकारांना उधारीत बियाणे दिले, त्यांचा शेतमाल कमी किमतीत खरेदी करण्याची त्यांना मुभा मिळायची. बहुतांश कृषीकेंद्र चालकच दलालीच्या धंद्यात असल्याने त्यांना असा व्यवहार सहज शक्य होता. तर हाती पैसा नसतानाही कास्तकारांचीही पेरणीची सोय व्हायची.
परंतु, कास्तकारांच्या याच अडचणीचा फायदा घेत बनावट बियाणे, बोगस बियाणे विक्री करण्याचेही प्रकार सुरू होते. त्यावर अंकुश लावण्यासाठी यंदा जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. बोगस बियाणे विकून एखाद्या कास्तकाराची फसवणूक झाल्यास संबंधित कृषीकेंद्रचालकावर फौजदारी गुन्हे नोंदविण्याचे आदेश आहेत. या आदेशाचा जिल्ह्यातील कृषीकेंद्रचालकांनी चांगलाच धसका घेतला आहे. शेतकऱ्यांना उधारीवर बियाणे देण्यात आता कृषी केंद्र धारकांना धोका वाटतो आहे. एखाद्या कास्तकाराला बियाणे विकल्यानंतर ते उगवले नाही, तर गुन्हे दाखल होणारच; मात्र उधारीही वसूल होण्याची शाश्वती नाही. त्यामुळे दरवर्षी उधारीचे व्यवहार करणाऱ्या कास्तकारांना यंदा कृषी केंद्रातून परत पाठविले जात आहे. फसवणूक टाळण्यासाठी प्रशासनाने गुन्हे दाखल करण्याचा दिलेला आदेश उपयुक्त असताना त्याच आदेशाच्या धसक्याने उधारीवर मिळणारे बियाणे दुरापास्त झाले आहे.
कृषीकेंद्रांवर वचक निर्माण करताना प्रशासनाने कास्तकारांना पीककर्ज सुलभरीत्या आणि तातडीने मिळण्याचा मार्ग खुला करण्याची गरज आहे. आर्थिक तंगीतील कास्तकारांनी यावर्षी धूळपेरणी टाळली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बरसलेल्या पावसानंतर पेरणीची लगबग सुरू केली.
मात्र, केवळ उधारीवरच ज्यांच्या शेतीचा संपूर्ण डोलारा आहे, त्या शेकडो शेतकऱ्यांना अजूनही पेरणी करता आलेली नाही. उधार बियाण्यांसाठी कास्तकारांनी हात पसरताच कृषीकेंद्रचालकांनी हात आखडता घेतला आहे.
बँकांनी त्वरित कर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे
गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाने ग्रामीण भागातील कृषी केंद्रचालक सध्या धास्तावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे ते बी-बियाणे उधार देण्यास तयार नाही. शेतकऱ्यांकडेही गेल्या तीन वर्षांपासूनच्या नापिकीमुळे दमडीही शिल्लक नाही. अशावेळी आता केवळ बँकाच शेतकऱ्यांच्या तारणहार आहे. त्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांच्या पेरणीचा मार्ग मोकळा करणे गरजेचे आहे. अद्यापही जिल्ह्यात ३५ ते ४० टक्के पेरण्या व्हायच्या आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बँकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून वरिष्ठांनीही तसे आदेश बँकांना द्यावेत.