नोटबंदीचा फटका, कॅश सेलमध्ये 70 टक्के घट

By Admin | Updated: November 15, 2016 17:02 IST2016-11-15T17:02:06+5:302016-11-15T17:02:06+5:30

नोटबंदीचा परिणाम बाजारपेठेतील कॅश सेलवर (रोखीने विक्री) झाला असून त्यात 70 टक्के घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

Cash cut, 70% reduction in cash sales | नोटबंदीचा फटका, कॅश सेलमध्ये 70 टक्के घट

नोटबंदीचा फटका, कॅश सेलमध्ये 70 टक्के घट

ऑनलाइन लोकमत, राजेश निस्ताने
यवतमाळ,दि. 15 - नोटबंदीचा परिणाम बाजारपेठेतील कॅश सेलवर (रोखीने विक्री) झाला असून त्यात 70 टक्के घट झाल्याची माहिती समोर आली आहे. या उलट क्रेडीट आणि डेबिट कार्डाचा वापर खरेदीसाठी वाढला असला तरी तो अद्याप तरुणाईपर्यंतच मर्यादित असल्याचे सांगितले जाते. 
 
8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 रुपयांच्या नोटांवरील बंदी जाहीर केल्यापासून बाजारपेठांना याचा फटका बसला आहे. काळा पैसा असलेली मंडळी तो पांढरा करण्यासाठी तर सामान्य माणूस नोटा बदलण्यासह बँकेतून रोख रक्कम काढण्यासाठी सैरभैर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  स्थानिक व्यापा-यांच्या माहितीनुसार, रोखीने होणारी खरेदी 70 टक्के कमी झाली आहे. अत्यावश्यक असलेल्या बाबीच खरेदी केल्या जात आहे. उर्वरित खरेदी पुढे ढकलण्यात आली आहे. 
 
अत्यावश्यक खरेदीतही क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड वापरले जात आहे. त्यात तरुण मंडळींचा पुढाकार आहे. परंतु बहुतांश खरेदीच्या ठिकाणी हे कार्ड वापरण्याची सोय नसल्याने नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे. ही स्थिती किमान चार ते सहा महिने राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सहज होणा-या खर्चाला मात्र या नोटबंदीमुळे चांगलाच ब्रेक लागला आहे. 
पर्यायाने भ्रष्टाचारालाही ब-याच अंशी ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
कारण देणा-याकडे भांडवलही नाही आणि वरकमाईही नाही. त्यामुळे देण्याची मानसिकता राहणार नसल्याने भ्रष्टाचार कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. नोटबंदीचा परिणाम सर्वत्रच जाणवत असल्याने बाजारपेठेच नव्हे तर जनजीवनही जणू ठप्प झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अत्यावश्यक असेल तरच खरेदी अशी सध्याची नागरिकांची भूमिका आहे. बँका व एटीएमसमोरील रांगा पाहूनच अनेकांना धडकी भरत असून त्यांनी खर्चाबाबत हात आखुडता घेतला आहे. 
 
मॉलमधील गर्दी वाढणार 
सर्वच प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने महानगरांमध्ये मॉलमधील गर्दी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण तेथे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्डद्वारे देयक अदा करणे सोईचे होते. 
 
‘रिअल इस्टेट’ला सर्वाधिक फटका 
सन 2007 पासून आधीच मंदीच्या लाटेचा सामना करणा-या ‘रियल इस्टेट’ व्यवसायाला नोटा बंदीचा सर्वाधिक फटका बसला आहे. प्रॉपर्टीचे मार्केट पूर्णत: कोसळले असून व्यापारी क्षेत्रात बिल्डर व विकासकांना मोठी झळ सोसावी लागत आहे. टोकन व 25 टक्के अ‍ॅडव्हॉन्स पेमेंटवर झालेले जुने व्यवहार उरर्वरित 75 टक्के रक्कम कशा स्वरूपात घ्यायची याचा पेच निर्माण झाल्याने अडचणीत सापडले आहेत. 
 
विदर्भात नागपूर हे रिअल इस्टेटचे मुख्य केंद्र आहे. तेथे सट्टा बाजारातील पैसा मोठ्या प्रमाणात बिल्डरांनी व्याजाने घेतला आहे. नोटा बंदीचा निर्णय जाहीर झाला त्याच रात्री एक कोटी ऐवजी 70 लाखांच्या रकमेवरच व्याज द्यावे, असे संदेश सट्टा माफियांकडून बिल्डरांना पोहोचले आहे. मात्र ते 70 लाख ‘न्यू करन्सी’ राहतील, असेही बजावण्यात आले. डिसेंबरपर्यंत व्याज मात्र जुन्याच नोटांवर घेतले जाणार आहे. व्याजाचे पैसे फेडण्यासाठी पुन्हा कर्ज घेण्याची वेळ अनेक बिल्डरांवर आधीच आली आहे. आता नोटा बंदीमुळे त्यांची पूर्णत: वाट लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे. 
 

 

Web Title: Cash cut, 70% reduction in cash sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.