जामडोहजवळ कार उलटून युवक ठार
By Admin | Updated: April 15, 2016 02:06 IST2016-04-15T02:06:21+5:302016-04-15T02:06:21+5:30
भरधाव कारने चार पलटी घेतल्याने झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले.

जामडोहजवळ कार उलटून युवक ठार
तीन गंभीर : नांदेड जिल्ह्यातून जात होते महाकालीच्या दर्शनाला
यवतमाळ : भरधाव कारने चार पलटी घेतल्याने झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात पांढरकवडा मार्गावरील जामडोह गावानजीक गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडला.
चरणसिंग ठाकूर (२५) असे मृताचे नाव आहे. तर चंदू पवार (२७), अजिंक्य काकडे (२६), विशाल घोडेस्वार (१८) सर्व रा. अर्धापूर जि. नांदेड अशी जखमींची नावे आहे. महाकालीचे भक्त असलेले हे सर्व तरुण कारने अर्धापूरवरून चंद्रपूरकडे दर्शनासाठी जात होते. जामडोह थांब्याजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण गेल्याने कारने चार पटली घेतली. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच खानगाव जामडोहचे सरपंच संतोष गदई यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी चरणसिंग ठाकूर याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी तब्बल तासाभराने धाव घेतली. तोपर्यंत अपघात स्थळावर माहिती देण्यासाठी कुणीही उपस्थित नव्हते. (कार्यालय प्रतिनिधी)