नरभक्षी वाघिणीचा २५ दिवसांपासून गुंगारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:39 IST2018-10-07T22:38:23+5:302018-10-07T22:39:46+5:30
पांढरकवडा, राळेगाव परिसरातील जंगलात भटकत असलेल्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत असला तरी वाघिण कायम गुंगारा देत आहे. त्यामुळे वनविभागाच्या प्रयत्नांना अद्यापही यश आले नाही.

नरभक्षी वाघिणीचा २५ दिवसांपासून गुंगारा
योगेश पडोळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पांढरकवडा, राळेगाव परिसरातील जंगलात भटकत असलेल्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत असला तरी वाघिण कायम गुंगारा देत आहे. त्यामुळे वनविभागाच्या प्रयत्नांना अद्यापही यश आले नाही. दरम्यान, शोधमोहिमेदरम्यान, राळेगाव तालुक्यातील विस्तीर्ण जंगलात वाघिणीचे पगमार्क आढळले असून त्याआधारे मचानीवरून तिचा शोध घेतला जात आहे. वाघिणीचे लाईव्ह लोकेशन मिळत नसल्याने टी-१ मिशनवर तुर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राळेगाव तालुक्यातील सराटी जंगलात नरभक्षक वाघिणीने १४ जणांचा बळी घेतला. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी १२ सप्टेंबरपासून वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी ए.के. मिश्रा, सुनिल लिमये यांच्यासह प्रचंड मोठा फौजफाटा जंगलात तळ ठोकून आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने वन्यजीव विभागाने अनेक उपाययोजना केल्यात. परंतु, नरभक्षक वाघिणीचे लाईव्ह लोकेशन अद्यापही मिळाले नाही.
राळेगावच्या विस्तीर्ण जंगलात असलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात नरभक्षक वाघिणीचे पगमार्र कैद झाले आहेत. या पगमार्कच्या आधारे वाघिणीचा पाठलाग केला जात आहे. जंगलात काही महत्त्वाच्या ठिकाणी मचानी निर्माण करण्यात आल्या असून, त्यावरून वन कर्मचारी दुर्बिणीद्वारे वाघिणीचा शोध घेत आहेत.
गत काही दिवसांपूर्वी टी-१ मिशनच्या यशस्वीतेसाठी मध्यप्रदेशातून चार तर ताडोबा येथून एक असे पाच हत्ती जंगलात सोडण्यात आले होते. मात्र, ३ आॅक्टोबर रोजी ताडोबातून आणलेला हत्ती अचानक अनियंत्रीत झाला. त्याने चहांद व पोहणा येथे धुडगूस घातला. यात अर्चना कुळसंगे या महिलेचा बळी गेला, तर एक वृद्ध महिला जखमी झाली. याशिवाय गावातही मोठे नुकसान झाले. अखेर वन विभागाने नियंत्रणाबाहेर गेलेल्या हत्तीला राष्ट्रीय महामार्गावर जेरबंद केले. त्यानंतर हे पाचही हत्ती परत पाठविले आहे. यानंतर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सूर्योदय ते सूर्यास्त अशी मोहिम चालवण्यात आली. मात्र असे असताना वन्यजीव विभागाला कोणतेही यश मिळाले नाही. वाघिणीला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे असल्यामुळे पुन्हा हैद्राबाद येथून शुटर नवाबला बोलाविण्याचा हालचाली सुरू वनवर्तुळात सुरू झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.
वाघिणीला शोधण्यासाठी मचाणीचा आधार
१४ जणांचे बळी घेणाºया वाघिणीला जेरबंद करण्यासाठी राळेगाव, पांढरकवडा परिसरातील जंगलात वन्यजीव विभाग तळ ठोकून आहे. १२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान २५ दिवसांच्या कालावधीत तिचे लाईव्ह लोकेशन मिळाले नाही. त्यामुळे आता मचानीचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी जंगलात मचानीवरून अद्ययावत दुर्बिणीद्वारे नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला जात आहे.