नरभक्षक वाघाची दहशत कायम
By Admin | Updated: November 14, 2016 01:17 IST2016-11-14T01:17:36+5:302016-11-14T01:17:36+5:30
गेल्या तीन महिन्यापासून पांढरकवडा, राळेगाव व कळंब तालुक्यातील सिमावर्ती भागात एका पट्टेदार वाघाने धुमाकुळ घातला आहे.

नरभक्षक वाघाची दहशत कायम
शेतकरी भयभीत : वाघाचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला अपयश
पांढरकवडा : गेल्या तीन महिन्यापासून पांढरकवडा, राळेगाव व कळंब तालुक्यातील सिमावर्ती भागात एका पट्टेदार वाघाने धुमाकुळ घातला आहे. शेतकरी-शेतमजूरांवर सतत होत असलेल्या नरभक्षक वाघाच्या हल्ल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असून या वाघाची दहशत अद्यापही कायम आहे.
पांढरकवडा, राळेगाव व कळंब या तालुक्यातील सिमावर्ती भागात या नरभक्षक वाघाने मागील तीन महिन्यापासून चांगलाच धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत या वाघाने चार जणांचा बळी घेतला असून अनेकांना जखमी केले आहे. अनेक जनावरांनादेखील या वाघाने ठार मारले आहे. परंतु वनविभागाने या नरभक्षक वाघाचा अद्यापही बंदोबस्त न केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात नरभक्षकवाघाने तीन जणांचा बळी घेतला. ४ सप्टेंबर रोजी राळेगाव तालुक्यातील खैरगाव कासार येथील शेतकरी मारोती विठोबा नागोशे आपल्या शेतात काम करीत असतांना अचानक हल्ला करुन त्याला ठार मारले. मारोती आपल्या पत्नीसह नेहमीप्रमाणे शेतात गेला होता. शेतकाम आटोपल्यानंतर दोघेही घराकडे निघाले होते. दरम्यान मारोतीने आपल्या पत्नीला घराकडे पाठविले व मी चारा घेऊन येतो म्हणुन तिला सांगीतले. परंतु बराच वेळ होत आला मारोती घराकडे आला नाही म्हणून गावकऱ्यांनी शोध घेतला असता, शेतापासून दीड किलोमिटर अंतरावर मारोतीचा मृतदेह आढळून आला. नरभक्षक वाघाने मारोतीला फरफटत नेऊन त्याची नरडी फोडलेली व पाय धडावेगळा असलेला आढळून आला.
ही घटना घडून अवघे २४ तासही उलटत नाही तोच या नरभक्षक वाघाने पाचमोह जंगलात एका गुराख्याला ठार मारले. झोटिंगधरा ता.पांढरकवडा येथील सखाराम टेकाम हा ५० वर्षीय गूराखी ५ सप्टेंबर रोजी पाचमोह जंगलात गुरे चारावयासाठी गेला होता. परंतु बऱ्याच रात्री उशीरा पर्यंत तो परत न आल्यामुळे त्याचा शोध घेतला असता जंगलात एक गाय मृतावस्थेत आढळून आली व गाई शेजारीच सखारामचा मृतदेह आढळून आला. वाघाने सखारामच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले होते. सततच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात धास्ती भरली असतांनाच बोराटी येथील सोनूबाई वामन घोसले या ४५ वर्षीय महिलेला ती शेतात काम करीत असतांना नरभक्षक वाघाने हल्ला करुन तिला ठार मारले. या घटनांमुळे घास्तावलेल्या नागरिकांनी नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.
वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरच या वाघाचा बंदोबस्त करु. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही असे आश्वासन दिले. परंतु या नरभक्षक वाघाचा वनविभागाकडून अद्यापपर्यंत कोणताही बंदोबस्त करण्यात आला नाही. अशा प्रकारच्या घटना घडणे पुन्हा सुरुच आहे. पुन्हा ऐन दिवाळीच्या दिवशी तेजनी ता.राळेगाव येथील गुराखी प्रविण पुंडलिक सोनवणे या २५ वर्षीय गुराख्यावर नरभक्षक वाघाने हल्ला केला व चवथा बळी घेतला. रोजंदारीवर काम करणारा प्रविण हा दिवाळीच्या दिवशी आपल्या मालकाच्या गायी चारावयासाठी जवळच असलेल्या तेजनी-बोराटीच्या जंगलात घेऊन गेला होता.
दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक त्याच्यावरवाघाने हल्ला केला. त्याला दोन किलोमिटर फरफटत नेले व त्यातच त्याचा मृत्यु झाला.ही घटना घडत नाही तोच गेल्या पाच दिवसापुर्वी आठ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घोरदडा येथील जंगलात गायी चारत असलेल्या तुळशीराम तानबा वाघाडे या ४५ वर्षीय गुराख्यावर नरभक्षक वाघाने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले.
त्याचे नशीब बलवत्तर होते म्हणुन तो बचावला. सततच्या या घटनांमुळे या परिसरात एव्हढी दहशत निर्माण झाली आहे की, आपल्या शेतात जायचीसुध्दा कोणाची हिम्मत होत नाही. शेतमाल काढायचा कसा, कपाशीची वेचनी कशी करायची याची चिंता शेतकऱ्यांना आणि शेत मजूरांना सतावत आहे. शेतात येण्यास शेतमजुर घाबरत असल्यामुळे काही प्रमाणात शेतीची कामेसुद्धा ठप्प पडल्याचे दिसून येत असून वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)