मतदारांना शोधताना उमेदवारांची दमछाक

By Admin | Updated: November 18, 2016 02:34 IST2016-11-18T02:34:39+5:302016-11-18T02:34:39+5:30

नगरपरिषद निवडणुकीने पुसदचे वातावरण ढवळून निघत असून गल्लीबोळात वाहनांद्वारे ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे.

Candidates tired of finding voters | मतदारांना शोधताना उमेदवारांची दमछाक

मतदारांना शोधताना उमेदवारांची दमछाक

नगरपरिषद निवडणूक : प्रचारासाठी कार्यकर्ते मिळेना
पुसद : नगरपरिषद निवडणुकीने पुसदचे वातावरण ढवळून निघत असून गल्लीबोळात वाहनांद्वारे ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. मात्र मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन केलेला प्रचारच विजयाची खात्री देते. त्यामुळेच प्रत्येक उमेदवार मतदारांच्या दारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अनेक मतदारांचा शोधच लागत नसल्याने उमेदवारांची दमछाक होत आहे. तर दुसरीकडे नोटा बंदीमुळे प्रचारासाठी कार्यकर्तेही मिळेनासे झाले आहे.
पुसद नगरपरिषदेच्या निवडणुकीत यावेळी खरी रंगत येत आहे. आमदार मनोहरराव नाईकांच्या सौभाग्यवती अनिताताई नाईक निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच वार्डावार्डातही कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढती होत आहे. प्रत्येक उमेदवार विजयासाठी धडपडताना दिसत आहे. मालवाहू वाहनांवर मोठ्ठाले पोस्टर लावून विकासाचे आश्वासन दिले जात आहे. इतरांपेक्षा आपणच कसे सक्षम आहोत हे रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगितले जात आहे. तसेच सकाळपासून वार्डावार्डात प्रचार रॅली काढली जात आहे. ऐनकेन प्रकारे मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयोग सुरू आहे.
मात्र वार्डांची नव्याने रचना झाल्याने अनेक मतदार या प्रभागातून त्या प्रभागात गेले आहे. अशा मतदारांचा शोध घेण्याचे दिव्य उमेदवारांना पार पाडावे लागत आहे. अनेकदा तर आम्ही तुमच्या प्रभागात येत नाही, असे बोल ऐकण्याची वेळही काही उमेदवारांवर आली आहे. परंतु काही का असेना मतदाराच्या दारापर्यंत जाण्यासाठी अनेक जण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. परंतु सध्या नोटा बंदीचा फटका अनेक उमेदवारांना बसत आहे. मतदार यादीतून नाव शोधण्यासाठी कार्यकर्तेच मिळत नाही. सर्व कार्यकर्ते बँकांच्या रागांमध्ये लागले आहे. अशा परिस्थितीत मतदारांच्या दारापर्यंत पोहोचताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. आता यावर काय उपाययोजतात हे विजयाचे गणित ठरविणार आहे. (प्रतिनिधी)

सोशल मीडियाचा वापर वाढला
मतदारांंना आपलेसे करण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप ग्रृपच्या माध्यमातून मतदारांना आपलेसे केले जात आहे. आपण किती प्रभावी आहो, आपल्याला विकास कामांची कशी जाण आहे, शहर कसे स्वच्छ-सुंदर करू असे नानाविध संदेश सोशल मीडियावरून फिरत आहे. परंतु मतदारांच्या ग्रृपमध्ये एकाच वेळी येणारे असंख्य मॅसेज मतदार वाचत असतील याची कुणालाही खात्री नाही. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीवरच सर्वांचा जोर आहे.

Web Title: Candidates tired of finding voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.