उमेदवारांना हुडहुडी, कार्यकर्त्यांना जोष
By Admin | Updated: October 18, 2014 23:02 IST2014-10-18T23:02:22+5:302014-10-18T23:02:22+5:30
विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर उद्या रविवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा रविवार ‘सुपर संडे’ ठरणार असून उमेदवारांना आता चांगलीच हुडहुडी भरली आहे. कार्यकर्ते मात्र जोमात

उमेदवारांना हुडहुडी, कार्यकर्त्यांना जोष
रवींद्र चांदेकर - वणी
विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर उद्या रविवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा रविवार ‘सुपर संडे’ ठरणार असून उमेदवारांना आता चांगलीच हुडहुडी भरली आहे. कार्यकर्ते मात्र जोमात असून आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचे छातीठोकपणे सांगत आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात एकूण १३ उमेदवार होते. त्यापैकी पाच उमेदवारांमध्येच खरी लढत झाली. या पाच उमेदवारांमध्ये कॉंग्रेसचे वामनराव कासावार, शिवसेनेचे विश्वास नांदेकर, राष्ट्रवादीचे संजय देरकर, भाजपाचे संजीवरेड्डी बोदकुरवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू उंबरकर यांचा समावेश होता. हे पाचही उमेदवार मतदान आटोपल्यानंतर आपल्या विजयाचा दावा करीत आहेत. त्यांचे कार्यकर्तेही जोमात आहेत. साहेब, भाऊ हमखास निवडून येणारच, असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. मतदानानंतर सर्वच उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आकडेमोड सुरू केली आहे. तथापि, मतदारांनी नेमके काय केले, हे रविवारीच कळणार आहे.
रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. वणीत तब्बल २३ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे दुपारी ३ वाजतापर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. तथापि सकाळी ११ वाजतानंतरच जनमताचा कौल कळण्यास सुरूवात होणार आहे. पहिल्या फेरीपासून कोणता उमेदवार आघाडी घेतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र मतमोजणी केंद्रनिहाय होणार असल्याने नेमका अंदाज बांधणे कठीण जाणार आहे. कारण एखादा उमेदवार पहिल्या, दुसऱ्या फेरीत आघाडीवर असल्यास तोच उमेदवार २२, २४ व्या फेरीतही आघाडीवर असेलच, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे शेवटच्या फेरीपर्यंत निकालाची उत्कंठा कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या पाचपैकी चार निवडणुका काँग्रेसच्या वामनराव कासावार यांनी जिंकल्या आहे. ते सतत ११९० पासून मतदार संघाचे प्रतिनिधीत्त्व करीत आहे. त्यांना केवळ २००४ मधील निवडणुकीत पराजयाचा सामना करावा लागला होता. त्यापूर्वी ते तिनदा आमदार होते.
चौथ्या निवडणुकीत ते हरले अन् शिवसेनेचे विश्वास नांदेकर जिंकले होते. पाचव्यांदा कासावार यांनी पुन्हा बाजी मारून नांदेकर यांना हरविले. त्यामुळे कासावार यांची ही सहावी निवडणूक आहे. सर्वात अनुभवी उमेदवार तेच आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदार कोणता फैसला सुनावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.