उमेदवार मतदारांच्या दारात

By Admin | Updated: November 5, 2016 00:12 IST2016-11-05T00:12:24+5:302016-11-05T00:12:24+5:30

नगरपरिषद निवडणुकीत नामांकन मागे घेण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर असली तरी आतापासूनच अनेक उमेदवार मतदारांच्या दारात पोहोचले आहे.

Candidates at the doorstep of voters | उमेदवार मतदारांच्या दारात

उमेदवार मतदारांच्या दारात

विड्रॉलसाठी सात दिवस : आठ नगरपरिषदांत पाच लाख मतदार
यवतमाळ : नगरपरिषद निवडणुकीत नामांकन मागे घेण्याची अंतिम मुदत ११ नोव्हेंबर असली तरी आतापासूनच अनेक उमेदवार मतदारांच्या दारात पोहोचले आहे. प्रचाराचा अधिकृत नारळ फोडण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराने आपली व्यक्तिगत यंत्रणा कामाला लावली असून सकाळ-संध्याकाळ मतांचा जोगवा मागताना दिसत आहे.
जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून बुधवारी उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली. आठ नगरपरिषदांतील ३७० नामांकन अर्ज छाननीत बाद झाले. १२४७ अर्ज मंजूर झाले. आता उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर आहे. निवडणुकीचे अद्याप चित्र स्पष्ट नाही. परंतु अनेक उमेदवारांनी आपल्या व्यक्तिगत प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवाराकडून मतदारांची मनधरणी सुरू केली आहे. उमेदवार आपला माहोल तयार करण्यासाठी कार्यकर्त्यांची विशेष बडदास्त ठेवत आहे. जाहीर प्रचारासाठी पक्षाकडून मिळणाऱ्या साहित्याची वाट न बघता उमेदवारांनी वैयक्तिक प्रचार साहित्यांचा वापर सुरू केला आहे. यासाठी खास शैलीतील पत्रके वाटली जात आहे. यामध्ये त्या-त्या प्रभागातील समस्यांवर भर दिला जात आहे. प्रभागातील राजकीय घडामोडींचा फायदा घेण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. आता मतदारांमध्येही जाहीर प्रचाराची क्रेझ राहिली नाही. त्यामुळे थेट भेटीवरच भर दिला जात आहे. उमेदवार आपली भूमिका समजावून सांगत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी जेवणावळीही उठत आहे. पक्षाकडून प्रचारसाहित्य आणि निधीहीची प्रतीक्षा न करता अनेकांनी नगरसेवक होण्यासाठी आपला खिसा सैल केला आहे. तर काहींनी विधान परिषदेतील उमेदवाराकडून ‘टोकन’ मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. त्याच गंगाजळीवर नगरपरिषद निवडणुकीचे नियोजन केले जात आहे.

सर्वाधिक मतदार यवतमाळात
आठ नगरपरिषदेपैकी सर्वाधिक मतदार यवतमळात असून ४ लाख ६९ हजार ५७७ मतदारपैकी २ लाख ३३ हजार १५० मतदार आहेत. पुसद ५५ हजार ७६७, वणी ४५ हजार ९२३, उमरखेड ३६ हजार ९३९, दिग्रस ३१ हजार ७८७, दारव्हा २७ हजार ७५, आर्णी २३ हजार ३९३ तर घाटंजीत १५ हजार ५४३ मतदार आहेत. नगराध्यक्षाच्या आठ जागेसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी तर रात्रीचा दिवस केला आहे. यवतमाळात लढतांना विधानसभे इतकेच नियोजन करावे लागत आहे. एकट्यास शहरात २९१ मदतान केंद्र राहणार आहे. त्यानुसार बुथ रचना करण्याची कसरत आहे.

चिन्हाची प्रतीक्षा
अपक्ष उमेदवाराकडे चिन्ह नसल्याने त्यांना प्रचार करताना अडचण येत आहे. ११ नोव्हेंबरला दुपारी तीन नंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया पाड पडणार आहे. तोपर्यंत तरी अपक्षांना केवळ मी उमेदवार आहे इतकेच मतदारांना सांगत आहे.

Web Title: Candidates at the doorstep of voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.