शंकर बडे विधान परिषदेचे उमेदवार
By Admin | Updated: October 25, 2016 02:34 IST2016-10-25T02:34:08+5:302016-10-25T02:34:08+5:30
जिल्ह्यातील विधान परिषद आणि आठ नगरपरिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय

शंकर बडे विधान परिषदेचे उमेदवार
मुंबईत निर्णय : काँग्रेस स्वबळावर लढणार
यवतमाळ : जिल्ह्यातील विधान परिषद आणि आठ नगरपरिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.
मुंबईत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. त्यात यवतमाळची विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची उमेदवारी पांढरकवडाचे नगराध्यक्ष शंकर बडे यांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला. शिवाय जिल्ह्यातील आठपैकी सात नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. दिग्रसचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. मात्र, लवकरच तेथील नावाची घोषणा केली जाणार आहे.
शंकर बडे यांच्या उमेदवारीने आघाडी होणार का, उमेदवार कोण, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विधान परिषदेसाठी काँग्रेसकडे सहा नावे आली होती. त्या सर्व नावांवर संसदीय समितीसमोर चर्चा झाली. अखेर सर्व पैलूंनी विचार करून शंकर बडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बडे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे यांचे खंदे समर्थक मानले जातात. बडे यांचे नाव जाहीर झाल्याने काँग्रेसच्या यादीतील अन्य उमेदवारांवर इतर पक्षांकडून गळ टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भाजपा, शिवसेना या पक्षांची ‘सक्षम’ उमेदवारांच्या शोधात भटकंती सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपातील घोळ कायम
४विधान परिषद व नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी, भाजपा, सेनेतील गुंतागुंत मात्र कायम आहे. भाजपा विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत आहे. तर या बालेकिल्ल्यातून पर्याय म्हणून नागपूरच्या माजी मंत्र्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. शिवसेनेने मुंबईतील एका उद्योगपतीची चाचपणी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याची वेळ आलेल्या राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी ‘मोठा की लहाना’ अशी रस्सीखेच घरातच पाहायला मिळत आहे. सेनेने मात्र नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करून नगरपरिषदेत आघाडी घेतली.
यवतमाळ विधान परिषद आणि नगरपरिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय मुंबईच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. विधान परिषदेची उमेदवारी काँग्रेसने शंकर बडे यांना तर यवतमाळ नगराध्यक्षपदाची उमेदवारी संध्याताई सव्वालाखे यांना देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
- वामनराव कासावार,
अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ