मोहा येथील दत्त गृहनिर्माण संस्थेचे ले-आऊट रद्द करा

By Admin | Updated: June 4, 2015 02:07 IST2015-06-04T02:07:31+5:302015-06-04T02:07:31+5:30

स्थानिक मोहा या गावामध्ये श्री दत्त गृहनिर्माण सहकारी संस्थेने थाटलेले ले-आऊट बोगस नकाशे व कथीत अतिक्रमणाच्या मुद्यावरून तत्काळ रद्द करण्याचे आदेश ..

Cancel the layout of the Datta Housing Society in Moha | मोहा येथील दत्त गृहनिर्माण संस्थेचे ले-आऊट रद्द करा

मोहा येथील दत्त गृहनिर्माण संस्थेचे ले-आऊट रद्द करा

यवतमाळ : स्थानिक मोहा या गावामध्ये श्री दत्त गृहनिर्माण सहकारी संस्थेने थाटलेले ले-आऊट बोगस नकाशे व कथीत अतिक्रमणाच्या मुद्यावरून तत्काळ रद्द करण्याचे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी यवतमाळचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांना दिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून यवतमाळ एसडीओ कार्यालयाने कार्यवाही सुरू केली असून या संबंधीचे आदेश जारी केले जाणार असल्याचे एसडीओ विकास माने यांनी तक्रारकर्ता दिनेश बोरा यांना सांगितले. दत्त गृहनिर्माण सहकारी संस्थेने मोहा येथे गट नं. ३४८/२ मध्ये २.८० हेक्टर आर जमिनीत ले-आऊट तयार केले होते. त्या बाजूलाच ललिता दिनेश बोरा यांचे गट नं. ३४८/१ चार एकर सात गुंठे शेत आहे. मात्र ले-आऊट मालकाने स्वत:चा पांदण रस्ता सरकारी असल्याचे खोटे दाखवून बोरा यांच्या शेतात सुमारे १५ हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण केल्याची बतावणी केली. त्या विरोधात बोरा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. सदर ले-आऊट हे सन २००२ च्या मोजणीनुसार थाटले गेले आहे. विशेष असे या एकाच ले-आऊटचे दोन नकाशे (मोजणी शिट) आहे. एकावर ६१ तर दुसऱ्यावर ६६ प्लॉट दाखविले गेले आहे. दिनेश बोरा यांनी स्वत: दहा हजार रुपये भरून १६ एप्रिल २०१३ रोजी भूमिअभिलेख विभागामार्फत सरकारी मोजणी करून घेतली. तेव्हा बोरा यांनी कोणतेही अतिक्रमण केले नसल्याचे स्पष्ट झाले, तसा अहवालही सादर झाला. मात्र त्यानंतरही महसूल विभागातून ले-आऊटधारक संस्थेची वेगवेगळ्या कारणावरून पाठराखण केली जात होती. मोजणी शिटमध्ये तफावत आढळल्यास अकृषक परवाना रद्द केला जाईल, असे स्पष्ट परवान्यात नमूद असतानाही महसूल यंत्रणेकडून या कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. अखेर बोरा यांनी थेट जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या दरबारात धाव घेतली. बोरा यांचे प्रकरण ऐकून व पाहून घेतल्यानंतर सिंह यांनी मोहा येथील दत्त गृहनिर्माण संस्थेचे ले-आऊट तत्काळ रद्द करण्याचे आदेश बुधवारी एसडीओ विकास माने यांना दिले आहे. यानुसार २४ तासात ले-आऊट रद्दचे आदेश जारी केले जातील, असे माने यांनी बोरा यांना सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Cancel the layout of the Datta Housing Society in Moha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.