मारेगावात प्रचाराचा धडाका

By Admin | Updated: October 21, 2015 02:49 IST2015-10-21T02:49:38+5:302015-10-21T02:49:38+5:30

नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटपाची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाल्याने आता बुधवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे.

Campaigning in Maregaon | मारेगावात प्रचाराचा धडाका

मारेगावात प्रचाराचा धडाका

पंचरंगी लढतीमुळे चुरस : बंडखोरांमुळे पक्षीय उमेदवार सापडले अडचणीत
मारेगाव : नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटपाची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाल्याने आता बुधवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. सर्वच पक्ष स्वबळावर सत्तेत येण्यासाठी जनमत आजमावत आहे. त्यामुळे सर्व प्रभागात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
वणी विधानसभा क्षेत्रात पक्षाची ताकद वाढविण्याच्या हेतूने सर्वच राजकीय पक्षांनी येथील नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर एका वर्षाने होणाऱ्या या निवडणुकीत पाचही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मरगळ झटकून कंबर कसली आहे. परिणामी नगरपंचायत निवडणूक खुपच चुरशीची बनली आहे. या निवडणुकीत पाचही राष्ट्रीय पक्ष ताकदीने उतरले आहे. तथापि एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची अपेक्षा नसल्याने जो-तो पक्ष ‘पळा-पळा, आघाडी मिळवा’, या तत्वाने पळत सुटले आहे.
या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी, विविध पक्षांच्या नेत्यांमध्येच चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत कोणतीही कसर सोडायची नाही, असा चंगच या पक्षांच्या प्रमुखांनी बांधला आहे. आता पुढील १० दिवस प्रचाराचा धडाका रंगणार आहे. त्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहे. या चुरशीत राज्यस्तरीय नेत्यांना प्रचाराच्या रणांगणात उतरविण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे बुधवारपासून १० दिवस शहरवासीयांना राजकीय कलगीतुरा फुकटात बघता येणार आहे.
राष्ट्रीय पक्षांची येथील सतराही प्रभागात मातब्बर व सक्षम उमेदवार शोधण्यासाठी अक्षरश: दमछाक झाली होती. यातच काँग्रेस व शिवसेनेपुढे बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. या बंडोबांना थोपवताना या पक्षांची दमछाक होत आहे.
येथील नगरपंचायतीवर पहिला झेंडा फडकविण्यासाठी किमान नऊ नगरसेवकांची गरज भासणार आहे. हा जादूई आकडा पार करण्याची सध्या कोणत्याच पक्षाला आशा असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)

झरी : येथील नगरपंचायतीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांनी आता प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे.
देशात सर्वात लहान नगरपंचायत म्हणून या नगरपंचायतीची ओळख निर्माण होणार आहे. १ हजार ५६ मतदार मतदान करणार आहे. मतदार कमी असल्याने अत्यंत कमी फरकाने उमेदवार विजयी व पराजयी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पक्ष व उमेदवारांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. झरीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने मोठा निधी मिळणार आहे. परिणामी गाावाच्या विकासाची मोठी संधी मिळणार आहे.
कमी लोकसंख्या व मोठा निधी, यामुळे बरीच विकास कामे करण्याची संधी विजयी उमेदवारांना मिळणार आहे. मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज लागणार आहे. झरीमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता, शौचालयाची व्यवस्था, ले-आऊटमधील समस्या, बाजारासाठी स्वतंत्र जागा, प्रवासी निवाऱ्याची व्यवस्था, महिला प्रसाधनगृहे यासह अनेक मूलभूत सुविधांची गरज आहे.
या निवडणुकीत १६ जागांसाठी आता ६१ उमेदवार रिंगणात कायम आहे. या १६ जागांसाठी विविध पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहे.
अपक्ष उमेदवारही ताकदीने लढताना दिसत आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल, तसा प्रचारात बदल करावा लागणार आहे. मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता विवेकबुद्धीने उमेदवार निवडण्याची खरी गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Campaigning in Maregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.