कापूस खरेदी खासगी बाजार समितीत
By Admin | Updated: December 7, 2014 22:58 IST2014-12-07T22:58:41+5:302014-12-07T22:58:41+5:30
शासनाची कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध असताना पणन महासंघाने चक्क खासगी बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरू केल्याचा प्रकार पुढे आला आहे. विशेष असे याबाबत

कापूस खरेदी खासगी बाजार समितीत
अपवाद : पांढरकवड्यात शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळले
यवतमाळ : शासनाची कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध असताना पणन महासंघाने चक्क खासगी बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरू केल्याचा प्रकार पुढे आला आहे. विशेष असे याबाबत शासनाच्या बाजार समितीचे पदाधिकारी
अथवा प्रशासनानेसुद्धा ब्र काढलेला नाही.
महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी सुरू केली आहे. आतापर्यंत पणन महासंघ हे फेडरेशनचा सब एजंट म्हणून काम करीत होते. परंतु आता पणनकडेही पैसा नाही आणि नाफेडकडेही नाही. म्हणून पणनने आता कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय)चे सब एजंट म्हणून काम सुरू केले आहे.
बहुतांश ठिकाणी शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पणनची कापूस खरेदी सुरू झाली असताना पांढरकवडा मात्र त्याला अपवाद ठरले आहे. पांढरकवड्यात चक्क खासगी बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरू आहे.
वास्तविक या खासगी बाजार समितीमध्ये पुरेशा सोईसुविधा नसल्याच्या कारणावरून पणन संचालकांनी व त्यानंतर पणन मंत्र्यांनीसुद्धा परवाना रद्द केला होता. मात्र उच्च न्यायालयाने मंत्र्यांच्या या निर्णयाला स्थगनादेश दिला. पांढरकवडा बाजार समिती सक्षम असताना खासगी बाजार समितीमध्ये कापूस खरेदी पणनने सुरू करण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे.
त्यामागे पणनचे राजकारण, पदाधिकाऱ्यांचा दबाव आणि उलाढाल असण्याची दाट शक्यता सहकार क्षेत्रात वर्तविली जात आहे. त्याहून आश्चर्य असे की, लाखो रुपयांचा सेस मिळवून देणारी कापूस खरेदी खासगी बाजार समितीने पळविल्यानंतरही पांढरकवड्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याबाबत ब्रसुद्धा काढला नाही. यावरून शासकीय व खासगी बाजार समितीची ‘मिलीभगत’ तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली.
यापूर्वी सीसीआय आणि व्यापाऱ्यांच्या संगनमताने पांढरकवडा येथे रूईगाठींचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हापासून सीसीआयच्या लेखी पांढरकवडा हे काळ्या यादीत आहे. आज मात्र अप्रत्यक्षपणे पुन्हा सीसीआयच येथे कापूस खरेदी करीत आहे. (प्रतिनिधी)