३५ हजार क्विंटल तूर खरेदी
By Admin | Updated: June 19, 2017 00:55 IST2017-06-19T00:55:14+5:302017-06-19T00:55:14+5:30
गत पाच महिन्यात उमरखेड उपविभागातील उमरखेड व महागाव तालुक्यातील तीन हजार २९८

३५ हजार क्विंटल तूर खरेदी
नाफेडची खरेदी : उमरखेडमध्ये पुन्हा तूर खरेदीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : गत पाच महिन्यात उमरखेड उपविभागातील उमरखेड व महागाव तालुक्यातील तीन हजार २९८ शेतकऱ्यांची ३५ हजार ६४२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. नाफेड व शासनाने पुन्हा तूर खरेदी सुरू करावी अशी मागणी उपविभागातील एक हजार २३८ शेतकऱ्यांनी केली आहे.
उमरखेडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नाफेडने तूर खरेदी केली. १६ जानेवारी ते ६ जून या कालावधीत ३५ हजार ६४२ क्विंटल तुरीची खरेदी झाली. खरेदी काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. खरेदीचा हा यवतमाळ जिल्ह्यातील विक्रम आहे. तूर विकलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम पेरणीपूर्वीच रकमा वितरीत करण्यात आल्या आहे. परंतु आजही अनेक शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे. त्यामुळे महागाव आणि पुसद तालुक्यातील एक हजार २३८ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. या शेतकऱ्यांनी आता तत्काळ पुन्हा तूर खरेदी सुरू करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान शासनाने तूर खरेदीबाबत सनियंत्रण समिती गठित केली असून समितीचे अध्यक्ष तहसीलदार भगवान कांबळे आहे तर सदस्य सचिव म्हणून सहायक निबंधक सुनील भालेराव, बाजार समिती सचिव संदीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे काय याची पाहणी केली जात असून दोन दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश बाजार समितीला देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा तूर खरेदी सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. शासन आदेश केव्हा काढणार याकडे लक्ष लागले.
शेतकऱ्यांच्या घरी तूर
उमरखेड आणि महागाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरी अद्यापही तूर आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. परंतु तूर विकली जात नसल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. नाफेडने पुन्हा खरेदी सुरू करावी, अशी मागणी आहे.