पणनने वणीला डावलले

By Admin | Updated: November 11, 2015 01:40 IST2015-11-11T01:40:47+5:302015-11-11T01:40:47+5:30

वणी तालुका हा कापूस पिकात अग्रेसर असून येथे पणन महासंघाचे क्षेत्रीय कार्यालयसुद्धा आहे.

Butanane said to the winnable | पणनने वणीला डावलले

पणनने वणीला डावलले

शेतकऱ्यांची लुबाडणूक : हमी दरापेक्षा कमी दराने कापूस खरेदी
वणी : वणी तालुका हा कापूस पिकात अग्रेसर असून येथे पणन महासंघाचे क्षेत्रीय कार्यालयसुद्धा आहे. मात्र पणन महासंघाने वणीमध्ये कापूस खरेदीला बगल दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
यावर्षी पणन महासंघाने नुकताच कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. काही ठरावीक कापूस संकलन केंद्रांवर कापूस खरेदीचा निर्णय घेत कापूस खरेदीचा शुभारंभही केला. वणी क्षेत्राअंतर्गत कोरपना येथे कापूस खरेदीचे केंद्र पणन महासंघाने सुरू केले आहे. मात्र वणीला कापूस खरेदीपासून अद्याप वंचितच ठेवले आहे. तालुक्यात कापूस व सोयाबीन ही दोनच मुख्य पिके घेतली जातात. वणी उपविभाग कापूस उत्पादनात आघाडीवर आहे.
तालुक्यात कापसावर प्रक्रिया करणारे डझनभर जिनिंग कारखानेही आहेत. कापूस गाठीच्या वाहतुकीसाठी येथे रेल्वे स्टेशन आहे. एवढ्या सुविधा असतानाही पणन महासंघाने वणी येथे कापूस खरेदी केंद्र का सुरू केले नाही, हे अद्याप कोडेच आहे. वास्तविक चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस वणीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. आता वणीचा कापूस कोरपना येथे नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
वणी येथे शासनाची कापूस खरेदी सुरू नसल्याने खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचा भाव पाडला आहे. तीन हजार ८०० ते तीन हजार ९०० रूपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी केला जात आहे. हमी दरापेक्षाही कमी दराने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. त्यातच कापसाचा चुकारा देण्यासाठी १५ दिवस ते एक महिना विलंब लावला जात आहे. नगदी चुकारा हवा असल्यास दोन टक्के रक्कम कापून घेतली जात आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. लोकप्रतिनिधी मात्र गप्प आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Butanane said to the winnable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.