कृषिपंप चोरट्या टोळीचा पर्दाफाश
By Admin | Updated: November 9, 2014 22:35 IST2014-11-09T22:35:15+5:302014-11-09T22:35:15+5:30
यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात गेल्या वर्षभरात शेकडो मोटरपंप, पाईप आणि केबल चोरीस गेल्या. पोलिसांच्या अनास्थेने चोरटे निर्ढावले होते. अखेर गावातील शेतकऱ्यांनीच कृषिपंप चोरट्या

कृषिपंप चोरट्या टोळीचा पर्दाफाश
शिवानंद लोहिया - हिवरी
यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात गेल्या वर्षभरात शेकडो मोटरपंप, पाईप आणि केबल चोरीस गेल्या. पोलिसांच्या अनास्थेने चोरटे निर्ढावले होते. अखेर गावातील शेतकऱ्यांनीच कृषिपंप चोरट्या टोळीचा पर्दाफाश केला. चोरीतील एक मोटरपंप, ७० पाईप ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
डोमा चव्हाण ऊर्फ महाराज रा.भांबराजा असे संशयिताचे नाव आहे. तर मोहन दगडू राठोड रा.भांबराजा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्याच्या साथीदाराचे नाव आहे. गेल्या वर्षभऱ्यात हिवरीसह लगतच्या गावांमधील शेतातून शेकडो मोटरपंप, पाईप, केबल आणि इतर शेती साहित्य चोरीस गेले. उगाच पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून यातील बहुतांश घटनांची तक्रारच शेतकऱ्यांनी पोलिसात दिलेली नाही. यातच सुभाष भिकमचंद लोहिया रा.हिवरी यांच्या शेतातील मोटरपंप सुमारे पंधरा दिवसांपूर्वी चोरीस गेला. गावातील अथवा लगतच्या परिसरातील चोरट्यानेच हा मोटरपंप लंपास केला असावा, असा संशय त्यांना होता. अनिल गावंडे यांच्या शेतातील सोयाबीन चोरीस गेल्यानंतर दोघेही चोरट्याच्या मागावर होते. त्यातच अशोक मनवर यांच्या भांब येथील शेतात चोरीतील सोयाबीन आढळून आली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच शेतकरी लोहिया तेथे पोहोचले. यावेळी त्यांनीही शेताची बारकाईने पाहणी केली. त्यात विहिरीतील मोटरपंप आपलेच असल्याची ओळख त्यांनी पटविली. शिवाय काही शेतकऱ्यांनी सुमारे ७० पाईपची ओळख पटविली. दरम्यान, अशोक मनवर यांना शेतात पाचारण करण्यात आले. तेव्हा त्यांनी हे शेत तीन वर्षासाठी डोमा चव्हाण ऊर्फ महाराज याला मक्त्याने दिले असल्याचे सांगितले. त्याचीच ही मोटार आणि पाईप असल्याचीही माहिती त्यांनी दिली. त्यावरून शेतकऱ्यांनी चोरीतील मोटर, पाईप आणि नोझल असे शेती साहित्य ताब्यात घेऊन यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. यावेळी ग्रामीण ठाणेदारांनी मात्र चोरीतील हे साहित्य ठाण्यात का आणले, असा प्रश्न उपस्थित करून चोरीचा छडा लावणाऱ्या शेतकऱ्यांवरच आगपाखड केली. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. वास्तविक शेतकरी अथवा नागरिकांनी अशी गंभीर घटना उघडकीस आणल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला हवी. मात्र या प्रकाराने गुन्हेगारी नियंत्रणात कोण मदत करेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.