बसस्थानक खड्डामय
By Admin | Updated: October 31, 2015 00:23 IST2015-10-31T00:23:10+5:302015-10-31T00:23:10+5:30
एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त यवतमाळ बसस्थानकाची केविलवाणी अवस्था झाली आहे.

बसस्थानक खड्डामय
शारीरिक वेदना : लाखो नागरिकांची वर्दळ असतानाही सातत्याने दुर्लक्ष
यवतमाळ : एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त यवतमाळ बसस्थानकाची केविलवाणी अवस्था झाली आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय ही बाब नवीन राहिली नाही. आता तर त्यांना शारीरिक वेदनाही सहन कराव्या लागत आहे. बसस्थानकाच्या संपूर्ण परिसरात खड्ड्यांचा पसारा आहे. बस बाहेर काढताना चालकांना करावी लागणारी कसरत जीवावर बेतण्याचीही भीती आहे.
संपूर्ण बसस्थानकातील गिट्टी उखडून मोठमोठे खड्डे तयार झालेले आहे. अर्धा ते एक फूट खोल आणि आठ ते दहा फूट रूंद असे अनेक खड्डे याठिकाणी आहे. धामणगाव मार्गावर धावणाऱ्या बसेस आणि बसस्थानकाबाहेर निघणाऱ्या प्रवेशद्वारासमोरील खड्डे याचा पुरावा देत आहे. या बसस्थानकात राज्यातील जवळपास भागातून बसेस येतात. त्यात ठिकठिकाणचे प्रवासी असतात. एखाद्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या रस्त्यालाही लाजवेल, अशी स्थिती बसस्थानक परिसराची आहे. चांगला भाग शोधूनही सापडत नाही. कुठे कुठे तर मोठमोठ्या नाल्या तयार झालेल्या आहेत. त्यातून भरधाव बस मार्ग काढते त्यावेळी प्रवाशांना जीव मुठीत घ्यावा लागतो.
गेली अनेक वर्षांपासून बसस्थानक परिसराची दुरुस्ती झालेली नाही. साधी डागडुजीही करण्याचे सौजन्य संबंधित विभागाकडून दाखविले गेले नाही. एकीकडे प्रवासी मिळत नसल्याची ओरड महामंडळाकडून केली जाते. परिणामी हा विभाग सातत्याने तोट्यात जात आहे. मात्र त्याच्या कारणांचा केवळ पाढा वाचला जातो. थातुरमातूर उपाय करून झालेल्या चुकांवर पांघरूण घातले जाते. प्रत्यक्ष कशामुळे नुकसान होत आहे याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला जात नाही. यातीलच खड्डामय झालेले बसस्थानक हे एक कारण आहे.
बसस्थानकाच्या बहुतांश भागात पसरलेली दुर्गंधी प्रवासी नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. राळेगाव मार्गावर धावणाऱ्या बसेस लागणारा भाग, धामणगावसाठी असलेल्या प्लाटफार्म परिसराची झालेली दैना हा गंभीर विषय आहे. बसस्थानक प्रमुख किंवा आगार प्रमुखाकडून या बाबीची पाहणी कधीही होत नसावी, हे यावरून स्पष्ट होते. हजारो नागरिक पाणी पित असलेल्या भागातील परिस्थिती तर याहीपेक्षा गंभीर आहे. कित्येक वर्षेपर्यंत याठिकाणच्या जलकुंभाची साफसफाई झालेली नसावी हे स्पष्टपणे दिसून येते.
खड्डामय झालेला बसस्थानक परिसर, निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य, अनियमित बसफेऱ्या आदी कारणांमुळे नागरिक त्रस्त आहेत. विभाग नियंत्रकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)