प्रवासी मिळविण्यासाठी बसस्थानकात धुमाकूळ
By Admin | Updated: October 14, 2016 03:08 IST2016-10-14T03:08:53+5:302016-10-14T03:08:53+5:30
पुसद बसस्थानकातून प्रवासी ओढून नेण्यासाठी अवैध आॅटो चालक व ट्रॅव्हल्स चालक बसस्थानकात शिरकाव करीत असून या गंभीर प्रकारामुळे महामंडळ कमालीचे हतबल झाले आहे.

प्रवासी मिळविण्यासाठी बसस्थानकात धुमाकूळ
महामंडळ हतबल : पोलिसात तक्रार करूनही मुजोरी कायम
पुसद : पुसद बसस्थानकातून प्रवासी ओढून नेण्यासाठी अवैध आॅटो चालक व ट्रॅव्हल्स चालक बसस्थानकात शिरकाव करीत असून या गंभीर प्रकारामुळे महामंडळ कमालीचे हतबल झाले आहे. या प्रकाराबाबत महामंडळाने यापूर्वीच पोलिसात तक्रारही केली आहे.
पुसद बसस्थानकात दररोज बाहेरगावावरून प्रवासी ये-जा करीत असतात. या बसस्थानकात बस फलाटावर लागेपर्यंत प्रवासी बसून असतात. याचाच लाभ उचलत काही आॅटोचालक बसस्थानकात प्रवेश करून आपले वाहन उभे करतात. त्यानंतर ते प्रवाशांना बसमधून किंवा फलाटावरून आपल्याकडे बोलावतात. नंतर ते प्रवाशांना आॅटोने गावाकडे नेतात. तसेच काही खासगी ट्रॅव्हल्सवालेही प्रवाशांना बोलावून नेत असल्याचे समजते. याबाबत अनेकदा महामंडळाने या अवैध वाहन चालकांना सूचनाही दिल्याची माहिती आहे. मात्र तरीही मुजोरीने आॅटोचालक बसस्थानकात प्रवेश करतात. मागील काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात एक नव्हे तर अनेक चारचाकी खासगी वाहने सकाळपासून दुपार व रात्रीपर्यंत उभेच असल्याचे बघावयास मिळत आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळ एकीकडे आपल्या उत्पन्नात कशी भर पडेल, याकडे लक्ष देत असतना दुसरीकडे अवैध प्रवासी वाहने महामंडळाच्या या उद्देशाला छेद देत असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ येथे जाण्यासाठी बसस्थानकाच्या समोरील भागातील उजव्या बाजूस ट्रॅव्हल्सही उभ्या असतात. त्यांच्याकडून दोनशे मीटर अंतराच्या नियमाचे पालन होते की नाही? हा संशोधनाचा विषय आहे. या ट्रॅव्हल्समधील क्लिनर व चालक बसस्थानकात प्रवेश करतात. यवतमाळ फलाटावर येऊन ते प्रवाशांना यवतमाळला कमी तिकीटात नेतो, असे सांगत असतात. काही प्रवासी त्यांच्या आमिषाला बळी पडून या ट्रॅव्हल्सने जातात. हा प्रकार नेहमीच बसचालक, वाहक व महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडतो. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी अनेकदा या अवैध वाहन चालकांना हटविल्यानंतरही ते पुन्हा मुजोरीने बसस्थानकात प्रवेश करतात. त्यांची अरेवारी वाढत चालली असल्याचे कर्मचारी खासगीत बोलतात. या बसस्थानकात स्वतंत्र पोलीस चौकी आहे, परंतु चौकीत पोलीस मात्र अभावानेच प्रवाशांना दिसतो. पोलीस व कर्मचाऱ्यांच्या नजरेआड बसस्थानकाकडून प्रवासी नेण्याचा प्रकार अद्यापही सुरूच आहे.
काही आॅटोचालक आपला आॅटो बसस्थानकासमोर असलेल्या किंवा दुसऱ्या एखाद्या पॉर्इंटवर नेऊन उभा करतात. त्यानंतर बसस्थानकात येऊन प्रवाशांना त्यांच्या मागे-मागे येण्यास सांगतात. आॅटोचालक आता लपून-छपून प्रवाशांना बसस्थानकाच्या बाहेर बोलावित आहेत. तर काही आॅटोचालक प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करीत असल्याचे दिसते. सोबतच बसस्थानकात दुचाकीस्वारांचीही मोठी धूम असते. (प्रतिनिधी)
महाविद्यालयीन विद्यार्थिनींना होतोय त्रास
शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी दररोज बसने ये-जा करतात. विद्यार्थिनींसमोर फ्लॅश मारण्यासाठी अनेक दुचाकीस्वार आपली दुचाकी बसस्थानकात नेतात. त्यामुळे बसस्थानकातील प्रसाधनगृहाजवळ नेहमी केवळ वाहनांचीच रांग दिसून येते. प्रवाशांच्या वाहनांची गैरसोय लक्षात घेऊन महामंडळाने बसस्थानकात पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र काही दुचाकी चालक तेथे वाहन न ठेवता बसस्थानकाच्या कोणत्याही परिसरात आपली वाहने उभी करतात. या दुचाकींमुळे एसटीबसला अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे.