माहूर येथे धावती एसटी बस पेटली
By Admin | Updated: March 7, 2016 02:15 IST2016-03-07T02:12:54+5:302016-03-07T02:15:44+5:30
पुसदहून माहूरकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली.

माहूर येथे धावती एसटी बस पेटली
सर्व प्रवासी सुखरुप : पुसद आगाराची बस
माहूर : पुसदहून माहूरकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली. ही घटना माहूर येथील भक्त मंडळासमोर रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. वाहकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व प्रवासी सुखरुप बाहेर निघाले. मात्र प्रवाशांनी बर्निंग बसचा थरार प्रत्यक्ष अनुभवला.
पुसद आगाराची पुसद-माहूर ही बस (एम.एच.४०-९३७०) रविवारी दुपारी माहूरकडे येत होती. चालक उद्धव जाधव आणि वाहक विजय सुळलकर हे होते. माहूर शहरातील भक्त मंडळाजवळ बसमधून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात आले. वाहकाने समयसूचकता दाखवीत बस थांबविण्याची सूचना केली. बसमधील सर्व प्रवाशांना
खाली उतरविण्यास प्रारंभ झाला. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले.
बसच्या समोरील भागातून आगीचे लोळ उठू लागले. बसच्या इतर भागातही ही आग पसरली. हा प्रकार दिसताच माहूर येथील धाडसी तरुणांनी टँकर आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माहूर येथे असलेल्या ऊर्समधील आपत्ती व्यवस्थापन विभागाने आणलेला आगीचा बंबही घटनास्थळी दाखल झाला. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तोपर्यंत बस पूर्णत: जळून खाक झाली होती.
माहूरचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी पथकासह घटनास्थळ गाठून आग विझविण्यास मदत केली. या बसमधून प्रवास करणारे दिनेश लोंढे यांनी या बसमध्ये अनुभवलेला थरार सांगितला. वाहकाच्या समयसूचकतेने अनर्थ टळल्याचे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)