पुसदमध्ये जाळपोळ, दगडफेकीने तणाव

By Admin | Updated: July 31, 2014 00:14 IST2014-07-31T00:14:39+5:302014-07-31T00:14:39+5:30

रमजान ईदच्या दिवशी शिवाजी चौकात वाहन पार्किंगवरून पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेल्या वादाचे पडसाद पुसद शहरात दुसऱ्या दिवशीही उमटले. शहरातील काही भागात जाळपोळ तर

Burnout in Pusad, Stonework Tension | पुसदमध्ये जाळपोळ, दगडफेकीने तणाव

पुसदमध्ये जाळपोळ, दगडफेकीने तणाव

जमावबंदी लागू : वाहनांचे नुकसान, पोलिसांचा चोख बंदोबस्त, शांततेचे आवाहन
पुसद : रमजान ईदच्या दिवशी शिवाजी चौकात वाहन पार्किंगवरून पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेल्या वादाचे पडसाद पुसद शहरात दुसऱ्या दिवशीही उमटले. शहरातील काही भागात जाळपोळ तर काही भागात दुकानांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान पोलिसांनी २५ आरोपींची ओळख पटविली असून त्यातील ११ जणांना अटक करण्यात आली.
पुसद येथे मंगळवारी रमजान ईदच्या दिवशी वाहन पार्किंगवरून डॉ.मोहंमद नदीम आणि एपीआय धीरज चव्हाण यांच्यात वाद झाला. या वादानंतर जमाव पुसद शहर पोलीस ठाण्यावर धडकला. ठाण्यातून परत जाताना शहरातील काही खासगी रुग्णालये आणि व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक केली. या घटनेनंतर पुसद शहरात तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशीही पुसद शहरात उमटले.
शहरातील शिवाजी चौक, गांधी चौक, मुखरे चौक, सुभाष चौक आणि बसस्थानक परिसरातील दुकानांवर तुफान दगडफेक करण्यात आली. तर नाईक चौकाजवळील एका मोटार मेकॅनिकलचे गॅरेज जाळण्यात आले. त्यात दुरुस्तीसाठी आलेल्या मोटारसायकली जळाल्या. तसेच पाण्याच्या टाकीजवळ असलेले फळ विक्रेत्याचे दुकानही पेटवून देण्यात आले. गुजरी चौकात असलेले सखाराम तगडपल्लेवार यांचे गोदामही जमावाने पेटवून दिले. या घटनेची माहिती पुसद शहरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला. वाशिम, अकोला येथून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. दरम्यान शहरात जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शांतता समितीची सभा
मंगळवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी ११ वाजता शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात शांतता समितीची सभा घेण्यात आली. या सभेला अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, डॉ.एन.पी. हिराणी, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, विजय पाटील चोंढीकर, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, तहसीलदार भगवान कांबळे, अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. मनोहरराव नाईक म्हणाले, प्रशासनाला काय कारवाई करायची ती करावी. खऱ्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. त्या दोषींवर मोक्का लावा की त्यापेक्षाही कठोर कारवाई करा, माझा पूर्णपणे प्रशासनाला पाठिंबा राहील, यात राजकारण येणार नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधील दोषींवर कडक कारवाई करून त्यांंना दोन दिवसात अटक झालीच पाहिजे. भविष्यात पुन्हा पुसद शहरात असा प्रकार करण्याची हिंंमत कोणी करणार नाही, असे ना. नाईक यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश डुबेवार यांच्या नेतृत्वात शहरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस विभागाला निवेदन देऊन दोषींंवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आयएमए व पुसद वैद्यकीय संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. दोषींना अटक करा अन्यथा बेमुदत दवाखाने बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला.
शांतता समितीची सभा सुरु असतानाच पुसद शहरातील बसस्थानक परिसर, डॉ. आंबेडकर चौक, गांधी चौक परिसरात दगडफेक सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांची धावपळ सुरू झाली. तत्काळ पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. राजकीय पक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स आणि डॉक्टर संघटनेच्यावतीने पुसद शहरात बंद पुकारण्यात आला होता. शहरातील सर्व प्रतिष्ठाने व दवाखाने कडकडीत बंद होते. दरम्यान अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांनी शहरात तोडफोड झालेल्या भागाची पाहणी केली. सकाळी १० वाजता त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत विजय जाधव, सुभाष कासेटवार आणि डॉक्टर मंडळीही होती. खासदार भावना गवळी यांनी पुसद शहराला भेट देऊन नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Burnout in Pusad, Stonework Tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.