शांततेला सुरुंग लावणारी बुलेट वाहने पोलिसांच्या निशाण्यावर
By Admin | Updated: November 9, 2016 00:26 IST2016-11-09T00:26:48+5:302016-11-09T00:26:48+5:30
दुचाकीतील राजेशाही वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलेटने मात्र आता यवतमाळातील शांततेला सुरुंग लावला आहे.

शांततेला सुरुंग लावणारी बुलेट वाहने पोलिसांच्या निशाण्यावर
कारवाईचा बडगा सुरू : जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश
यवतमाळ : दुचाकीतील राजेशाही वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलेटने मात्र आता यवतमाळातील शांततेला सुरुंग लावला आहे. अशा कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
बुलेट हे वाहन पूर्वी प्रतिष्ठेचे मानले जात होते. बुलेट सुरु करायलाही मोठे कष्ट पडत होते. त्यामुळे सर्वसामान्य या वाहनाच्या भानगडी पडत नव्हते. परंतु आता बुलेटलाही सेल्फ स्टार्ट आले आणि बुलेट चालविणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. मात्र वाढलेल्या या बुलेटने शहराची शांतता भंग केली आहे. कर्कश आवाज करीत शहरावरून बुलेट धावत असल्याने ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.
श्रीमंत आणि खास करून महाविद्यालयीन तरुण लक्ष वेधण्यासाठी बुलेटचा चित्रविचित्र आवाज काढतात. अशा बुलेटवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बडगा उगारला आहे. वाहतूक शाखेला अशा वाहनांवर कारवाईची सूचना दिली आहे. पोलिसांनी अशा कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर आता लक्ष केंद्रीत केले असून त्यामुळे अनेकांची पंचाईत झाली आहे. (शहर वार्ताहर)
चार दिवसात डझनावर बुलेटवर कारवाई
खुद्द जिल्हा दंडाधिकाऱ्यांनीच कारवाईचे आदेश दिल्याने वाहतूक शाखा खळबडून जागी झाली आहे. अशा बुलेटचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. गत चार दिवसात डझनावर वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही शहरातील रस्त्यांवर बुलेटचा कर्कश आवाज सुरूच आहे.