घाटंजी पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक दीड कोटींचे
By Admin | Updated: March 5, 2017 00:55 IST2017-03-05T00:55:55+5:302017-03-05T00:55:55+5:30
नगरपरिषदेचे एक कोटी ४८ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक नगराध्यक्ष नयना शैलेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे.

घाटंजी पालिकेचे शिलकी अंदाजपत्रक दीड कोटींचे
विविध मार्गाने सव्वा कोटींचे उत्पन्न : वृक्षारोपणाची कामे हाती घेणार
घाटंजी : नगरपरिषदेचे एक कोटी ४८ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक नगराध्यक्ष नयना शैलेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे. पुढील वर्षभरात शहर विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहे. यात प्रामुख्याने वृक्षारोपणाच्या कामाला प्राधान्य दिले जाईल, असे नगराध्यक्षांनी अंदाजपत्रक मंजूर करताना सांगितले.
२०१६-२०१७ या वर्षाचे सुधारित आणि २०१७-२०१८ चे अनुमानित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये अनुमानित शिलकीसह २०१७-२०१८ साठी दोन कोटी २० लाख ८० हजार रुपये जमा दर्शविण्यात आले आहे. खर्चासाठी एक कोटी ९९ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात करापासून एक कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न दर्शविण्यात आले आहे. याशिवाय बाजार हर्रास, दुकानभाडे आदी माध्यमातून एक कोटी ३० लाख, तर इतर चार लाख रुपये उत्पन्न दाखविण्यात आले आहे.
प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, क्रीडा संकूल, नाट्यगृह, दुकान गाळे, बाजार परिसराचा विस्तार, एलईडी, उद्यान, सौंदर्यीकरण आदी कामे हाती घेण्यासोबतच वृक्षारोपणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले. (तालुका प्रतिनिधी)