यवतमाळात काट्याची टक्कर
By Admin | Updated: October 11, 2014 23:13 IST2014-10-11T23:13:16+5:302014-10-11T23:13:16+5:30
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काट्याची टक्कर होत आहे. येथील लढत सर्वाधिक लक्षवेधी राहणार आहे.

यवतमाळात काट्याची टक्कर
यवतमाळ : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काट्याची टक्कर होत आहे. येथील लढत सर्वाधिक लक्षवेधी राहणार आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक तीन लाख ३८ हजार ८१७ मतदार आहेत. त्यात १ लाख ७५ हजार ९२४ पुरुष तर १ लाख ६२ हजार ८९१ महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात दोन तृतीय पंथी मतदारांचीही नोंद झाली आहे. १५ आॅक्टोबर रोजी मतदान होऊ घातले असून प्रत्यक्ष निवडणुकीसाठी आता केवळ चार दिवस उरलेले आहेत.
या मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे रिंगणात आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया, भाजपाचे माजी आमदार मदन येरावार, शिवसेनेचे संतोष ढवळे, बसपाचे तारीक लोखंडवाला हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय महसूल कर्मचाऱ्यांचे नेते रवींद्र देशमुख, ओबीसी संघाचे प्रदीप वादाफळे, मनसेचे भानुदास राजने, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे दिलीप मुक्कावार, भारिप बहुजन महासंघाचे अशोक शेंडे, रिपाइंचे सोपान कांबळे, राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पार्टीचे पुरुषोत्तम भजगवरे आदी २२ उमेदवार निवडणूक लढवित आहे. येथे पंचरंगी लढतीची चिन्हे दिसू लागली आहे. थेट लढत राष्ट्रवादी-भाजपात होते की, काँग्रेस व शिवसेनेत याकडे नजरा लागल्या आहेत. काँग्रेसच्या राहुल ठाकरेंवर बाहेरचा उमेदवार म्हणून ठपका ठेवला जात आहे. बसपाच्या तारीक लोखंडवाला यांच्यामुळे काँग्रेसच्या परंपरागत मुस्लीम आणि दलित मतांमध्ये विभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे. कुणबी मतांच्या बळावर विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसला येथेही रवींद्र देशमुख व प्रदीप वादाफळे या उमेदवारांमुळे मत विभाजनाचा सामना करावा लागणार आहे. त्यातच कुणबी समाज एकवटत असल्याच्या केवळ वार्तेनेच अन्य समाज एकत्र येऊन काँग्रेसच्या विरोधात उभा होताना दिसतो आहे. जनतेतील काँग्रेसवर आणि विशेषत: माणिकराव ठाकरेंवर असलेली नाराजी, मतविभाजन बघता राहुल ठाकरे बरेच माघारल्याचे चित्र आहे. काँग्रेसवरील नाराजीमागे महिला आमदार नंदिनी पारवेकरांचे कापलेले तिकीट हे प्रमुख कारण सांगितले जाते. यामुळे यवतमाळ मतदारसंघातील महिलांनी काँग्रेसला धडा शिकविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या उलट स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप बाजोरिया यांची आहे. (कार्यालय प्रतिनिधी)