बीएसएनएलचे एक्सचेंज डाऊन
By Admin | Updated: October 11, 2014 02:12 IST2014-10-11T02:12:51+5:302014-10-11T02:12:51+5:30
निवडणुकीचे वातावरण आणि सणासुदीच्या दिवसात बीएसएनएलची दूरध्वनी, मोबाईल आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवा तब्बल २४ तास ठप्प झाल्याने एकच हाहाकार उडाला.

बीएसएनएलचे एक्सचेंज डाऊन
यवतमाळ : निवडणुकीचे वातावरण आणि सणासुदीच्या दिवसात बीएसएनएलची दूरध्वनी, मोबाईल आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवा तब्बल २४ तास ठप्प झाल्याने एकच हाहाकार उडाला. जिल्हा निवडणूक विभाग, बँका, शासकीय विभागांसह सर्वसामान्यांनाही याचा फटका बसला. कोणाचेच फोन लागत नसल्याने नेमके काय झाले हेही कळायला मार्ग नव्हता. बीएसएनएलच्या वेळकाढू धोरणामुळे हे संकट ओढवल्याची माहिती पुढे आली आहे.
भारत संचार निगम लिमिटेडचे येथील एक्सचेंज गुरुवारी सकाळी डाऊन झाले. त्यामुळे जिल्हाभरातील सेवा प्रभावित झाली. कुणाचेही फोन लागत नव्हते की इंटरनेट सेवाही सुरू होत नव्हती. बँकांच्या व्यवहारावरही त्याचा मोठा फटका बसला. लिंक फेल झाल्याचे कारण सांगत बँक कर्मचारी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करीत होते. (प्रतिनिधी)
बीएसएनएलच्या वेळकाढू धोरणाचा फटका
यवतमाळ येथील बीएसएनएलच्या पॉवर प्लँट विभागातील बॅटऱ्या कमजोर झाल्या आहे. त्यामुळे बंगलुरूवरून बॅटऱ्यांचे सेट बोलाविण्यात आले. परंतु बीएसएनएलमधील अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे या बॅटऱ्या वेळेत बसविण्यात आल्या नाही. त्यासाठी लागणाऱ्या तांब्याच्या पट्ट्याच गायब असल्याचे आढळून आले. वास्तविक जुन्या खराब झालेल्या बॅटऱ्यांच्या पट्ट्या वापरता येऊ शकल्या असत्या. परंतु तसे करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. वेळेवर तांब्यांच्या पट्ट्यांसाठी पैसे मंजूर करण्यात येऊन केवळ एक सेट लावण्यात आला. उर्वरित बटऱ्या चार महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहे आणि त्याचाच फटका जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांना बसला.