‘बीएसएनएल’च्या खुर्च्या रिकाम्या
By Admin | Updated: September 25, 2015 03:13 IST2015-09-25T03:13:35+5:302015-09-25T03:13:35+5:30
कर लो दुनिया मुठ्ठी में म्हणत इंटरनेट क्षेत्रात प्रगती करणाऱ्या भारतीय दूरसंचार विभागाची नेर कार्यालयाची स्थिती दयनीय आहे.

‘बीएसएनएल’च्या खुर्च्या रिकाम्या
नेर कार्यालय कुलूपबंद : मोबाईल-फोनचे बिल भरण्यासाठी दारव्ह्याचे हेलपाटे
किशोर वंजारी नेर
कर लो दुनिया मुठ्ठी में म्हणत इंटरनेट क्षेत्रात प्रगती करणाऱ्या भारतीय दूरसंचार विभागाची नेर कार्यालयाची स्थिती दयनीय आहे. गेल्या एक महिन्यापासून या कार्यालयात एकही कर्मचारी हजर नाही. त्यामुळे नागरिकांना निराश होऊन परत जावे लागते. हजारो रुपयांची उलाढाल त्यामुळे खोळंबली आहे. वरिष्ठांना मात्र याचे देणे-घेणे नाही. ‘लोकमत’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत या कार्यालयातील सर्व खुर्च्या रिकाम्या आढळून आल्या.
नेर येथे बीएसएनएल कार्यालयातील अधिकारी गेल्या चार महिन्यांपासून सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून हे पद अद्यापही रिक्तच आहे. अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर या कार्यालयावर एक प्रकारे अवकळाच पसरली आहे. गेल्या १५ दिवसापासून येथील लिपिक प्रशिक्षणासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्याच दिवसापासून या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर विचित्र प्रकारची सूचना लावण्यात आली आहे. ‘संगणक बंद असल्यामुळे येथील काम बंद असून खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, अशी सूचना नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. एक रोजंदारी कर्मचारी असून त्याच्याकडे तक्रारीचे रजिस्टर आहे. आलेल्या तक्रारींची नोंद त्यात करायची एवढेच काम त्याच्याकडे आहे. गेल्या एक महिन्यापासून एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने या कार्यालयाकडे ढुंकूनही पाहिले नाही.
रिकामे टेबल, बंद संगणक यामुळे येथील विदारक परिस्थितीचे दर्शन घडते. रिकाम्या कार्यालयात माणसांच्या गर्दीपेक्षा कुत्रे आणि बकऱ्या वास्तव्य करतात. गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत रिकाम्या खुर्च्याच आढळून आल्या. येथे दोन लाईनमन काम करतात, अशी माहिती मिळाली. हेच दोन कर्मचारी बीएसएनएलचा बाहेरचा डोल्हारा सांभाळतात, असे समजले. मात्र कार्यालयात कोणताही कर्मचारी उपस्थित राहात नाही. साधे बिल भरण्याचे कामही या ठिकाणी होऊ शकत नाही. बिल भरण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी थेट दारव्ह्याला जाण्याचा सल्ला देण्यात येतो.
अशाच समस्यांनी त्रस्त असलेले एक ग्राहक राजेश गुगलिया यांनी सांगितले की, मी गेल्या १५ दिवसांपासून या कार्यालयात बिलाच्या संदर्भात चौकशीसाठी जात आहे. पण कार्यालयात कुणीच नाही. तर येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी केवळ नोंदवून घेण्यापलीकडे आपण काहीही करून शकत नसल्याचे येथील रोजंदारी कर्मचारी म्हणाला.