भावासाठी फोडला परिचराचा पेपर
By Admin | Updated: November 23, 2014 23:25 IST2014-11-23T23:25:53+5:302014-11-23T23:25:53+5:30
जिल्हा परिषदेच्या परिचर पद भरतीचा पेपर विस्तार अधिकाऱ्याने आपल्या भावासाठी फोडल्याचे उघड झाले आहे. लोहारा परिसरातील केंद्रावर परीक्षा देणाऱ्या भावापर्यंत उत्तरे पोहोचविण्याचा त्याचा डाव होता.

भावासाठी फोडला परिचराचा पेपर
विस्तार अधिकारी निलंबित : गुन्हा दाखल
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या परिचर पद भरतीचा पेपर विस्तार अधिकाऱ्याने आपल्या भावासाठी फोडल्याचे उघड झाले आहे. लोहारा परिसरातील केंद्रावर परीक्षा देणाऱ्या भावापर्यंत उत्तरे पोहोचविण्याचा त्याचा डाव होता. यासाठी त्याने आपल्या एका सहकाऱ्याचीही मदत घेतल्याचा संशय व्यक्त आहे. दरम्यान या प्रकरणी विस्तार अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, पोलिसानी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेची पद भरती पेपरफुटीच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात चर्चेत आली आहे. यापूर्वी औरंगाबाद येथे पेपर फुटल्यामुळे चार संवर्गाची परीक्षा रद्द करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच शनिवारी परिचर पदाचा पेपर चक्क परीक्षा केंद्रावरून फुटला. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला जिल्हा आरोग्य विभागातील सांख्यकी विस्तार अधिकारी विक्रांत राऊत (३६) रा. सहयोगनगर यवतमाळ याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आपल्या भावासाठीच हा पेपर फोडल्याचे चौकशीत पुढे आले आहे. या कामात त्याला एका अधिकाऱ्याने मदत केल्याचा संशय व्यक्त होत आहे. राऊतचा भाऊ लोहारा येथील सुमित्राबाई ठाकरे नर्सिंग महाविद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रावर असल्याचे पुढे आले आहे. तेथे त्याला प्रश्नांची उत्तरे पोहोचविण्यासाठी या केंद्रावर असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या संपर्कात विक्रांत राऊत असल्याची बाबही पुढे आली आहे. जिल्हा परिषद मुलींची शाळा (काटेबाई) या परीक्षा केंद्रावरून दुपारी २ वाजताच्या सुमारास पेपर फोडल्याचे सिद्ध झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
पेपरफूट प्रकरणात अखेर विस्तार अधिकाऱ्याला अटक
परिचर पदाची परीक्षा रविवारी दुपारी सुरू होणार होती. यावेळी विक्रांत राऊत याने परीक्षार्थींना वर्गात पेपर वाटण्यापूर्वी अज्ञात व्यक्तीच्या हाती तो दिला. त्या व्यक्तीने प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स प्रत काढून मुळ प्रत राऊत याला परत केली. त्यामुळे वर्गात पुरविण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका जशाच्या तशा आढळून आल्या. ज्या अज्ञात व्यक्तीने झेरॉक्स काढून प्रश्नपत्रिका सहाय्यक विक्रीकर आयुक्ताकडे पोहोचविली नेमका तो व्यक्ती कोण याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. पांढरकवडा येथे कार्यरत एक अधिकारी या प्रकरणात समाविष्ट असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. सहायक विक्रीकर आयुक्त जगदीश पांडे यांच्याशीही संपर्क करण्यासाठी राऊत याने त्याच अधिकाऱ्याच्या संबंधाचा वापर केला असावा असा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपासाची सूत्रे हलविल्यास आणखी दोघांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे.
विस्तार अधिकारी सांख्यकी विक्रांत राऊत याने परीक्षा केंद्रावरून पेपर फोडून गोपनीयतेचा भंग केला आहे. याप्रकरणी राऊत याच्या विरोधात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी यांनी तक्रार दिली असून, राऊत याचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)