२२ तासांपासून वीज पुरवठा खंडित

By Admin | Updated: June 23, 2014 00:20 IST2014-06-23T00:20:49+5:302014-06-23T00:20:49+5:30

वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी व नियोजनशून्य कारभाराचा फटका गेल्या अनेक दिवसांपासून बाभूळगाव तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. आता तर नियोजनशून्यतेने कळस गाठला असून

Break the power supply for 22 hours | २२ तासांपासून वीज पुरवठा खंडित

२२ तासांपासून वीज पुरवठा खंडित

बाभूळगाव : वीज वितरणविरोधात संताप
बाभूळगाव : वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी व नियोजनशून्य कारभाराचा फटका गेल्या अनेक दिवसांपासून बाभूळगाव तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. आता तर नियोजनशून्यतेने कळस गाठला असून गेल्या २२ तासांपासून पहूर फिडरवरील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे परिसरातील अनेक गावे अंधारामध्ये आकंठ बुडाली होती.
शनिवारी दुपारी ४ वाजतापासून पहूर फिडरवरील वीज पुरवठा खंडित झाला. पहूर फिडरवरील नागरिकांना वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, वेळेवर भारनियमन करणे यामुळे अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. २१ जूनच्या दुपारी ४ वाजता असाच वीज पुरवठा अचानक बंद झाला. याचा फटका या फिडरवरून विद्युत पुरवठा होत असलेल्या जवळपास ३० गावातील हजारो नागरिकांना झाला. २२ जूनच्या दुपारी २ वाजता हा विद्युत पुरवठा सुरू झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
ऐन पावसाळ्याच्या दिवसातही तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे नियोजन मात्र योग्य असल्याचे दिसून येत नाही. या घटनेमुळे परिसरातील ३० गावांना अंधारात रात्र काढावी लागली. या संदर्भात वीज वितरण कंपनीशी संपर्क केला असता नागरिकांना मात्र उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याचा फटका सामान्य नागरिकांसह व्यावसायिकांना बसला.
शिंदी गावामध्ये नदी नसल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. वीज नसल्यामुळे गावातील हौद भरल्या गेले नाही. परिणामी गावातील पशुपालकांना तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा नदीवर पाणी पाजण्यासाठी जनावरांना न्यावे लागले. असाच त्रास इतरही गावातील नागरिकांना सहन करावा लागला.
पावसाळ्याच्या दिवसात असे प्रकार होवू नये, यासाठी वीज वितरण कंपनीने काळजी घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Break the power supply for 22 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.