तहसीलदारांचा कामावर बहिष्कार
By Admin | Updated: May 22, 2015 00:20 IST2015-05-22T00:16:41+5:302015-05-22T00:20:54+5:30
तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने पुरवठा विभागाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

तहसीलदारांचा कामावर बहिष्कार
यवतमाळ : तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने पुरवठा विभागाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. नाशिक येथे पुरवठा विभागाच्या संबंधानेच सात तहसीलदारांचे निलंबन करण्यात आले. या कारवाईवर संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. यवतमाळच्या संघटनेने तहसीलदार अनुप खांडे यांच्या नेतृत्त्वात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शासनाकडून तहसीलदारांना जाचक कारवाई केली जाते. ज्या कारणासाठी नाशिक जिल्ह्यात सात तहसीलदारांचे निलंबन केले त्यांच्यावरचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही. अशा स्थितीत केलेली कारवाई मागे घेण्यासाठी वारंवार संघटनेने पाठपुरावा केला. थेट मुख्य सचिव, प्रधान सचिव (महसूल), प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा यांच्यासोबत संघटना पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतरही कारवाई मागे घेण्यात आली नाही. त्यामुळे आता संघटनांनी शासनाला सात दिवसांचा अल्टीमेटम दिला असून २८ मेपासून पुरवठा विभागाचे संपूर्ण कामकाज कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी तहसीलदार डॉ. राजेश अडपावार, राजेश्वर काळे, नायब तहसीलदार संघटनेचे दिलीप झाडे, अजय गौरकार व जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)