आमीष देऊन गंडविणारे दोघे अटकेत

By Admin | Updated: July 16, 2016 02:41 IST2016-07-16T02:41:26+5:302016-07-16T02:41:26+5:30

सोन्याचे नाणे कमी पैशात देण्याचे आमीष दाखवून ९५ हजार रुपयाने गंडविणाऱ्या दोन जणांना गुरूवारी अटक करण्यात आली.

Both of them are guilty of cheating | आमीष देऊन गंडविणारे दोघे अटकेत

आमीष देऊन गंडविणारे दोघे अटकेत

कारंजातून घेतले ताब्यात : अकोटच्या मित्राला ९५ हजाराने ठकविले
नेर : सोन्याचे नाणे कमी पैशात देण्याचे आमीष दाखवून ९५ हजार रुपयाने गंडविणाऱ्या दोन जणांना गुरूवारी अटक करण्यात आली. बाळू महादेव जाधव (३४) व गजानन पंडित चव्हाण (३९) रा. कारंजा जि. वाशिम अशी त्यांची नावे आहेत. मुद्रीका चंद्रभान पटेल रा. अकोट जि. अकोला यांना सदर दोघांनी गंडविले होते.
रेल्वेतून प्रवास करताना सदर तिघांमध्ये मैत्री झाली. एकमेकांमध्ये संवाद वाढत गेला. मात्र घनिष्ठ झालेली मैत्री ठगबाजीत बदलली. बाळु जाधव व गजानन चव्हाण यांनी मुद्रीका पटेल यांना आपल्याकडे असलेले सोन्याचे नाणे कमी पैशात देतो असे सांगितले. या व्यवहारासाठी रेणुकापूर फाटा हे स्थळ ठरले. ६ जुलै रोजी सदर तिघे व्यवहारासाठी एकत्र आले. पटेल नाणे घेऊन तर बाळू आणि गजानन ९५ हजार रुपये घेऊन आपापल्या मार्गाने निघून गेले.
घरी पोहोचल्यानंतर पटेल याला नाण्याविषयी संशय आला. पण तोपर्यंत मित्रांनी दगा दिल्याचे त्याच्या लक्षात आले. थेट नेर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईल लोकेशनच्या आधारे बाळू आणि गजानन या दोघांना कारंजा येथून गुरूवारी अटक केली. त्यांना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
अटकेची कारवाई नेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय भुसारी, गणपत कोपुलवार, हरिचंद्र कार, राजेश चौधरी, अरविंद जाधव, प्रकाश धारगावे, प्रकाश बोबडे यांनी पार पाडली. अटकेतील आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. सदर घटनेत आणखी कोणाचा समावेश असावा काय, यादृष्टीनेही पोलिसांकडून तपास केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

Web Title: Both of them are guilty of cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.