जन्मदात्यानेच केली चिमुकल्याची हत्त्या

By Admin | Updated: February 26, 2017 01:11 IST2017-02-26T01:11:09+5:302017-02-26T01:11:09+5:30

तालुक्यातील सातघरी येथे जन्मदात्यानेच आपल्या चार वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्त्या केल्याचे उघडकीस आले.

Born of life | जन्मदात्यानेच केली चिमुकल्याची हत्त्या

जन्मदात्यानेच केली चिमुकल्याची हत्त्या

सातघरीची घटना : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, ‘पीएम’ने बिंग फोडले
महागाव : तालुक्यातील सातघरी येथे जन्मदात्यानेच आपल्या चार वर्षीय चिमुकल्याची गळा आवळून हत्त्या केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धीरज किशोर जाधव, असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. त्याचे वडील किशोर गोविंद जाधव (३५) हे सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होते. किशोर आणि पत्नीमध्ये नेहमी भांडण होत होते. भांडणात शेजारी मध्यस्थी करीत होते. मध्यस्थीनंतर कसा तरी त्यांचा वाद क्षमत होता. मात्र त्यांचा वाद कायमस्वरूपी निकाली निघालाच नाही. किशोर सतत पत्नीला चारित्र्यावरून छळत होता. या दाम्पत्याला धीरज नामक चार वर्षीय चिमुरडा होता. मात्र हा मुलगा आपला नाही, असे म्हणून किशोर नेहमी पत्नीशी भांडत होता.
शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास किशोरने घरीच गळा आवळून चिमुरड्या धीरजची हत्त्या केली. यावेळी त्याची पत्नी शेतात काम करण्यासाठी गेली होती. संशयाच्या भूताने पछाडलेला किशोर धीरजची हत्त्या केल्यानंतर अगदी आरामात काळी दौ. येथे बाजारासाठी गेला. सायंकाळी तो परत आला. परत येताना त्याने धीरजसाठी कपडे व खाऊसुद्धा आणला. यावेळी शेतातून परतलेल्या पत्नीने धीरजला उठविण्याचा प्रयत्न केला असता तो कोणतीही हालचाल करीत नव्हता. लगेच त्याला काळी येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी किशोरच्या पत्नीनेच महागाव पोलिसांकडे मुलाचा खून पतीनेच केल्याची तक्रार दिली. तक्रार व शवविच्छेदन अहवालावरून किशोरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Born of life