विचार परिवर्तनाने बोकडाला जीवदान
By Admin | Updated: May 13, 2014 00:12 IST2014-05-13T00:12:45+5:302014-05-13T00:12:45+5:30
अंधश्रद्धेतून नवस फेडण्यासाठी अथवा देवतेला प्रसन्न करण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची प्रथा या आधुनिक युगातही कायम आहे. डोळसपणाने विचार केल्यास क्रांती घडते.

विचार परिवर्तनाने बोकडाला जीवदान
विठ्ठल कांबळे - घाटंजी अंधश्रद्धेतून नवस फेडण्यासाठी अथवा देवतेला प्रसन्न करण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची प्रथा या आधुनिक युगातही कायम आहे. डोळसपणाने विचार केल्यास क्रांती घडते. याचीच प्रचिती घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे आली. बळीच्या बोकडाला जीवनदान देऊन अंधश्रद्धेला मुठमाती देण्यात आली. पारधी समाजात देवाला नवस बोलला जातो. नवस हा पूत्र प्राप्तीसाठी, कुटुंबातील मुल-बाळ सुखी राहण्यासाठी, कोणतेही संकट येऊ नये, पीक पाणी चांगले व्हावे, अर्थप्राप्ती व्हावी, अशा एक ना अनेक कारणांसाठी बळी दिला जातो. आपल्या सुखासाठी मुक्या जीवाला सुरावर चढविण्याचा हा दु:खदायक प्रकार विज्ञानवादी दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींना क्लेष्ट देणाराच आहे. या भोळसट विचाराला परिवर्तनवादी विचाराने छेद दिला. राजूरवाडी येथील पारधी समाजातील वसंता विष्णू घोसले (६0) यांचा मुलगा प्रेमदास घोसले (३0) याचा विवाह होऊन चार-पाच वर्ष लोटले. वंशाला दिवा नाही म्हणून अनेक उपास-तापास, नवस बोलणे झाले. बहीरम देवाला मुलबाळ होऊ दे म्हणून नवल बोलला. त्यांच्या नवसाला देव पावला. कुटुंबात कन्यारत्न जन्माला आले. तिला एक दीड वर्ष पूर्ण झाले. आता बोललेला नवस फेडायचा आहे. त्यासाठी बोकड खरेदी करण्यात आला. १४ मे रोजी पौर्णिमेच्या रात्री बहीरम देवापुढे बोकड्याचा बळी देण्याचा बेत ठरला. ही घटना गावातीलच विज्ञानवादी दृष्टीकोण असलेल्या दिगांबर राजगुरे या युवकाला कळली. त्याने पारधी बेडा गाठून वसंता घोसले आणि त्याचा मुलगा प्रेमदास घोसले यांची भेट घेतली. मुलीने जन्म घेतल्याने तुमच्या कुटुंबात आनंद आला. या आनंदाचा नवस फेडण्यासाठी मुक्या बोकडाचा बळी देणे देवाला आवडणार नाही, ही गोष्ट दिगंबरने पटवून दिली. नवस फेडण्यासाठी बोकडाचा बळी देण्याऐवजी पुरण-पोळीच्या जेवणाचा बेत आखण्यात आला. राजूरवाडी येथे पारधी समाजाचे जवळपास २७ घरे आहेत. सगळ्यांजवळ थोडीबहुत शेती आहे. शेतात राबून उदरनिर्वाह भागविणे ही त्यांची दिनचर्या आहे. शिक्षणाचे महत्व कळू लागल्याने येथील चार ते पाच मुले इंग्रजी शाळेला जातात. चार ते पाच मुलांनी बारावी तर सहा मुलांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. या शिक्षणामुळेच समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजही समाजात मोठय़ा प्रमाणात अंधश्रद्धा आहे, असे प्रेमदास घोसले यांनी सांगितले.