लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलिसांनी नेर तालुक्याच्या सोनवाढोणा गावातून जप्त केलेले ५७ बनावट रबरी शिक्के (स्टॅम्प) यवतमाळच्या दत्त चौकातून बनविले गेल्याचे निष्पन्न झाले आहे.शनिवारी पोलिसांनी या रबर शिक्के व झेरॉक्स सेंटरवर धाड घालून तपासणी केली. तेथून रामराव शेंद्रे (रा. परोपटे ले-आऊट, वडगाव) आणि सचिन ढबाले (रा. भांबराजा) या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात दोन आरोपींना यापूर्वीच अटक केली गेली आहे. या चारही आरोपींना आता न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या प्रकरणाचा तपास आतापर्यंत लाडखेड पोलिसांकडे होता. परंतु गुन्ह्याची व्याप्ती प्रचंड असल्याने हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे सखोल तपासासाठी सोपविण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी घेतला. त्यानुसार एलसीबीतील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे.यवतमाळ-अमरावती रोडवरील सोनवाढोणा येथे धाड घालून पोलिसांनी दोघांच्या घरातून एक-दोन नव्हे तर ५७ बोगस रबरी शिक्के जप्त केले होते. त्यात शासनाच्या विविध अधिकारी, कार्यालयांची नावे होती. त्या आधारे सातबारा व अन्य आवश्यक बोगस कागदपत्रे बनवून बँकांमधून लाखोंचे कर्ज उचलले गेले. शिवाय शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला गेला. या प्रकरणात अटक झालेल्या प्रमुख दोनही आरोपींची जेमतेम असलेली आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना मोहरा बनविले गेले असावे व खरे सूत्रधार दुसरेच कुणी असावे, असा संशय पोलिसांना आहे. या मास्टर मार्इंडचा पर्दाफाश केव्हा होतो याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. सेंट्रल बँकेच्या कर्ज प्रकरणात सोनवाढोणा व परिसरातील चार ते पाच गावातील आठ ते दहा दलाल पोलिसांच्या रडारवर आहेत. आरोपींकडून नेहमी बनावट कागदपत्रे व त्यावर शिक्के नेणारे नेमके कोण त्यांची यादी पोलिसांच्या स्तरावर बनविली जात आहे. आरोपीच्या कबुलीतून ही नावे उघड होत आहे. त्यामुळे आरोपी संख्या वाढणार आहे.
दत्त चौकात बनविले बोगस रबरी शिक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 21:59 IST
पोलिसांनी नेर तालुक्याच्या सोनवाढोणा गावातून जप्त केलेले ५७ बनावट रबरी शिक्के (स्टॅम्प) यवतमाळच्या दत्त चौकातून बनविले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. शनिवारी पोलिसांनी या रबर शिक्के व झेरॉक्स सेंटरवर धाड घालून तपासणी केली.
दत्त चौकात बनविले बोगस रबरी शिक्के
ठळक मुद्देआणखी दोघांना अटक : १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तपास एलसीबीकडे