‘एसटी’च्या बोगस पासचा भंडाफोड
By Admin | Updated: January 12, 2017 00:44 IST2017-01-12T00:44:16+5:302017-01-12T00:44:16+5:30
वाहकाच्या सतर्कतेमुळे एसटी महामंडळाच्या हंगामी बोगस पासचा भंडाफोड झाला आहे.

‘एसटी’च्या बोगस पासचा भंडाफोड
कर्मचारी निलंबित : दारव्हा आगारातून तयार झाल्या पास
यवतमाळ : वाहकाच्या सतर्कतेमुळे एसटी महामंडळाच्या हंगामी बोगस पासचा भंडाफोड झाला आहे. सावंतवाडी ते पुणे प्रवास मार्गावर हा प्रकार उघडकीस आला. कलर झेरॉक्स करून प्रवाशांना पासेस दिल्याचे स्पष्ट झाल्याने दारव्हा आगाराच्या कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे.
सावंतवाडी आगाराच्या सावंतवाडी ते पुणे बसमध्ये कोल्हापूर येथून कराड येथे जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांनी दिलेल्या हंगामी पासविषयी वाहकाला संशय आला. दोनही पास एकाच क्रमांकाच्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रवाशांनी दारव्हा आगारातून पास उपलब्ध करून घेतल्याचे सांगितले. पुढील तपासाच्यादृष्टीने संबंधितांनी दारव्हा आगाराशी संपर्क केला. दोनही पासचा क्रमांक एकच असल्याचे स्पष्ट झाले. दारव्हा येथील अक्षय अरविंद पोपळे आणि विकास प्रल्हाद तायडे यांच्याकडे या पास आढळल्या. मात्र ४ जानेवारी रोजी दारव्हा आगार पास वितरण केंद्रातून सदर दोघांच्या नावांची किंवा इतरही कुणाची हंगामी पास वितरित झाली नसल्याचे स्पष्ट झाले.
यासंदर्भात वाहतूक शाखेने चौकशी सुरू केली. यामध्ये कोऱ्या पासेसच्या कलर झेरॉक्स करून बनावट पासेस प्रवाशांना दिल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. या आधारे पास वितरण करणारे दारव्हा आगाराचे कर्मचारी ज्ञानेश्वर नारायण चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. हा प्रकार किती काळापासून सुरू होता, याचा शोध एसटीच्या वाहतूक शाखेकडून घेतला जात आहे. एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाची दक्षता शाखाही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. (वार्ताहर)