बोगस हॅमरने सागवान पासिंग
By Admin | Updated: April 10, 2015 00:10 IST2015-04-10T00:10:25+5:302015-04-10T00:10:25+5:30
वन खात्यात परवानाप्राप्त लाकडासाठी वापरले जाणारे हॅमर चक्क बोगस असल्याची खात्री खुद्द यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षकांना (सीसीएफ) झाली आहे.

बोगस हॅमरने सागवान पासिंग
यवतमाळ : वन खात्यात परवानाप्राप्त लाकडासाठी वापरले जाणारे हॅमर चक्क बोगस असल्याची खात्री खुद्द यवतमाळच्या मुख्य वनसंरक्षकांना (सीसीएफ) झाली आहे. त्यामुळे वन खात्याशी फितुरी करणाऱ्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना हातकड्या घालण्याची तयारी सुरू आहे.
जिल्ह्यात मौल्यवान सागवानाची बिनबोभाटपणे अवैध कत्तल सुरू आहे. हे सागवान तस्करीद्वारे लगतच्या राज्यात पाठविले जात आहे. वन खात्याची यंत्रणाही यात गुंतली आहे. यवतमाळचे उपवनसंरक्षक प्रमोद लाकरा यांनी काही ठिकाणी धाडी घालून सागवान जप्त केले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही.गुरमे यांनी स्वत: लक्ष घातले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी लाकरा यांच्याकडे सोपविली.
या पार्श्वभूमीवर गुरमे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, लाकरा यांच्या पथकाचा चौकशी अहवाल आठवडाभरात येईल. प्रथमदर्शनी खासगी शेतीत होणाऱ्या वृक्ष कटाईच्या आड संरक्षित जंगलातील सागवानाची तोड केली जात असल्याचे आढळून आले. मालकीच्या लाकडात वन जमिनीतील लाकडाची सरमिसळ केली जाते. वनक्षेत्रातील अशी आणखी किती प्रकरणे आहेत, याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळेच चौकशीला विलंब लागतो आहे. या प्रकरणात हॅमर संशयास्पद वाटत आहेत. एक तर हॅमर बोगस बनविले गेले असतील किंवा ज्याच्या ताब्यात आहे त्याने त्याचा गैरवापर केला असेल. एक बोगस हॅमर आढळून आला. अन्य हॅमर कुणाच्या ताब्यातून गेले याचा शोध घेतला जात आहे. सर्व काही निष्पन्न होताच हे प्रकरण पोलिसात दिले जाणार आहे. वन खात्याशी गद्दारी करणाऱ्या दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांना फौजदारी कारवाईद्वारे धडा शिकविला जाईल. काही लाकडांवर हाताने (डिजीटल इंग्लिश मार्क) हॅमर (आकडे) दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. आतापर्यंत चार प्रकारचे हॅमर आढळून आले. वडगाव वनपरिक्षेत्रातून ही चौकशी सुरू झाली. त्यात जिल्ह्यातील अन्य काही प्रकरणांचा समावेश करण्यात आला. जिल्ह्यातील मालकी प्रकरणे व त्या शेजारील जंगलांची तपासणी केली जात आहे. ‘वेट अॅन्ड वॉच’ करा सर्वकाही निष्पन्न होईल अशा शब्दात व्ही.व्ही. गुरमे यांनी कारवाईची हमी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)