बोगस डॉक्टरांनी थाटले दवाखाने

By Admin | Updated: June 24, 2015 00:10 IST2015-06-24T00:10:29+5:302015-06-24T00:10:29+5:30

तालुका आरोग्य विभागाच्या कामचुकारपणाचा लाभ घेत तालुक्यातील अनेक गावात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे.

The bogus doctor gave Thattay Dispensaries | बोगस डॉक्टरांनी थाटले दवाखाने

बोगस डॉक्टरांनी थाटले दवाखाने

आरोग्य विभाग मेहेरबान : कुणाचीच भीती नाही, ग्रामीण जनतेच्या जिवाशी खेळ
मारेगाव : तालुका आरोग्य विभागाच्या कामचुकारपणाचा लाभ घेत तालुक्यातील अनेक गावात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे. गरीब जनतेच्या जिवाशी हे डॉक्टर खेळत असून तालुका आरोग्य विभाग मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
आरोग्य सेवेच्या बाबतीत तालुका नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, यामुळे अनेकदा ग्रामीण जनतेला उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागले आहे. तथापि, त्यांच्या मृत्यूची कोणीही दखल घेत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वत्र ‘चांगभलं’ सुरू आहे. तालुक्यात आरोग्य विभागाची सेवा मिळत नसल्याने बोगस डॉक्टरांनी नेहमीच तालुक्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मात्र यापूर्वी तालुका आरोग्य विभागाच्या दक्ष भूमिकेमुळे त्यांना बिनबोभाट व्यवसाय करता येत नव्हता. तथापि, विद्यमान तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी या बोगस डॉक्टरांना अभय दिल्याची चर्चा असून तालुक्यातील आठ मोठ्या गावात या बोगस डॉक्टरांनी आपली दुकाने बिनबोभाट थाटली आहे.
या बोगस डॉक्टरांकडे व्यवसाय करण्याचे कसलेही परवाने नसतात. त्यांनी कसल्याही प्रकारचा वैद्यकीय अभ्यासक्रम केलेला नसतो. हे डॉक्टर सुरूवातीला काही दिवस मोठ्या डॉक्टरांच्या हाताखाली परिचर म्हणून काम करतात. तेथे मिळालेल्या जुजबी ज्ञानाच्या भरवशावर ते आदिवासी भागात जाऊन नागरिकांच्या अज्ञानाचा लाभ घेत त्यांच्या आरोग्याशी खेळतात. त्यांच्याकडे उपचाराचे केवळ जुजबी ज्ञान असताना मोठमोठ्या आजारांवर ते औषधोपचार करतात.
या डॉक्टरांकडे उपचाराची कोणतेही साधने नसतात. गर्भपात करणे, एखाद्यावर जटील आजाराची शस्त्रक्रिया करणे, आजाराच्या ठिकाणी थेट इंजेक्शन टोचून आजार बधीर करणे, असे अघोरी उपचार ते करीत असतात. या अघोरी उपचारातून बरेचदा नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले. नुकतेच एका बोगस डॉक्टरचे अनधिकृत गर्भपाताचे प्रकरण पोलिसात पोहोचले. अनेकांना या डॉक्टरांकडे उपचार केल्याने अपंगत्व स्विकारावे लागले, तर काहींना आपले प्राणही गमवावे लागले. तथापि ग्रामस्थांमध्ये अज्ञान असल्याने आणि भितीपोटी ते तक्रार करीत नसल्याने या बोगस डॉक्टरांचे चांगलेच फावत आहे.
सध्या तालुक्यात नवरगाव, म्हैसदोडका, रोहपट, बोटोणी, करणवाडी, खडकी, बुरांडा, कुंभा, नरसाळा, मार्डी, चोपण, चनोडा, कानोडा आदी गावांत बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे.
या बोगस डॉक्टरांमध्ये बहुतांश बंगालमधील डॉक्टरांचा समावेश आहे. दोन मराठी तरूणांचाही त्यात समावेश असल्याची कुजबूज सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)

पदवीही नाही आणि परवानाही नाही
साथरोग उद्भवल्यानंतर घेतले जाते आरोग्य शिबिर
तालुक्यात बोगस डॉक्टरांनी दुकानदारी थाटल्याची कबुली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गावंडे यांनी दिली. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच या बोगस डॉक्टरांना प्रॅक्टीस न करण्याच्या लेखी सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूचना देऊनही बोगस डॉक्टर प्रॅक्टीस करताना आढळल्यास त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डॉ.गावंडे यांनी दिली.

नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात तालुक्यात साथीच्या आजारांची लागण होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले. साथीची लागण होऊन नागरिक मृत्युमुखी पडल्यानंतर त्या गावात आरोग्य शिबिर घेतले जाते. तालुक्यात साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा
ग्रमाीण भागातील रूग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उभारण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामचलाऊ धोरणामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अनियमितपणा, औषधांच्या तुटवड्यामुळे गर्भवती महिलांची प्रसूती घरी किंवा या बोगस डॉक्टरांच्या निगराणीखाली होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आलेल्या रूग्णांना उपचाराअभावी आल्यापावली परत जावे लागत आहे.

Web Title: The bogus doctor gave Thattay Dispensaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.