बोगस लाभार्थ्यांनी लाटला वृद्धांचा पैसा

By Admin | Updated: October 25, 2015 02:27 IST2015-10-25T02:27:41+5:302015-10-25T02:27:41+5:30

महाराष्ट्र शासनाकडून वृद्ध कलाकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या वृद्ध कलाकार मानधन योजनेचा जिल्ह्यातील एक हजारांच्या जवळपास वृद्ध कलाकारांनी लाभ घेतला आहे.

The bogus benefici | बोगस लाभार्थ्यांनी लाटला वृद्धांचा पैसा

बोगस लाभार्थ्यांनी लाटला वृद्धांचा पैसा

पुसद : महाराष्ट्र शासनाकडून वृद्ध कलाकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या वृद्ध कलाकार मानधन योजनेचा जिल्ह्यातील एक हजारांच्या जवळपास वृद्ध कलाकारांनी लाभ घेतला आहे. यामध्ये बहुतांश कलाकारांनी खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे यातील अनेक कलाकार ‘डुप्लीकेट’ असून त्यांचा कोणत्याही कलाक्षेत्राशी सुतराम संबंध नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
प्रत्येक तालुका स्तरावर पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या वृद्ध कलाकार योजनेत वृद्ध कलाकारांना पाचशे रुपये दरमहा मानधन देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. त्यासाठी स्थानिक आमदाराची शिफारस हवी आणि २४ हजारांपेक्षा कमी उत्पन्न दाखविणे गरजेचे आहे. त्यामुळे जे मुळात गायक नाही, तसेच कोणत्याही कलेशी ज्यांचा संबंध नाही, अशांना मानधनाच्या स्वरुपात पैसे मिळविण्यासाठी ही योजना सोयीचे साधनच बनली आहे.
आमदाराच्या पत्रावर ‘हा अतिशय चांगला कलाकार असून त्यास मी ओळखतो. या व्यक्तीला वृद्ध कलाकार योजनेचा लाभ देण्यास हरकत नाही.’ अशा चार ओळी लिहून कोणतीही कला अवगत नसलेले कलाकार योजनेचा लाभ सहज मिळवत आहेत. असे बनावट कलाकार आमदारांच्या पीए किंवा निकटवर्ती नेत्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळवून योजनेचा लाभ घेत आहेत.
पुसद पंचायत समितीमार्फत ७० वृद्ध कलाकारांना मानधन दरमहा देण्यात येत आहे. यामध्ये बहुतांश लाभार्थी खोटी माहिती आणि खोटे उत्पन्न दाखवून मानधन मिळवित आहेत. शासकीय नोकरी करून सेवानिवृत्त झालेले लाभार्थीही वृद्ध कलाकार योजनेचे मानधन मिळवित आहेत. वास्तविक पाहता अशा नोकरीतून निवृत्त झालेल्यांचे निवृत्तीनंतरचेही उत्पन्न २४ हजारांपेक्षा जास्त असते. नोकरीत असताना त्याने कोणती कला जोपासली हे एक कोडेच आहे. मात्र केवळ नेत्यांच्या पुढे-पुढे करून वृद्ध कलाकार मानधन योजना त्यांनी स्वत:ला लागू करून घेतली आहे.
मुळात ही योजना चांगली आहे. या योजनेमुळे बऱ्याच वृद्ध आणि गरजू कलाकारांना मानधन दिल्यामुळे त्यांना उतारवयात ताठ मानेने जगता येते. परंतु, काही लाभार्थी घरून धनदांडगे असतानाही या योजनेचा फायदा घेण्यासाठी खोटी माहिती देऊन आर्थिक लाभ घेत आहेत. या प्रकारामुळे खरा वृद्ध कलाकार मात्र या योजनेच्या लाभापासून दूरच राहात आहे. मागील अनेक वर्षांपासून पुसद पंचायत समितीमधून वृद्ध कलाकार मानधन योजनेचा बोगस लाभ घेणारे अनेक महाभाग आहेत. शासनाने नव्याने योजनेचा लाभ घेण्याऱ्यांची यादी तयार करावी, यात आमदाराची शिफारस वगळून इतर काही ठोस पुरावे वृद्ध कलाकारांकडून मागविण्यात यावे, अशी मागणी उपेक्षित राहिलेल्या वृद्ध कलाकारांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

कलेची जोपासना करणाऱ्यांची उपेक्षा
आयुष्यभर कलेसाठी झटणारे लोक आयुष्याच्या शेवटच्या काळात मात्र आर्थिकदृष्ट्या हलाखीत खितपत पडतात. त्यांचे पैशाअभावी हाल होतात. कित्येकांना तर उतारवयातील आजारांमध्ये उपचारही घेणे शक्य होत नाही. अशा वृद्ध कलाकारांची वाताहत थांबविण्यासाठी शासनाने ही चांगली योजना सुरू केली. वृद्धांना त्रास होऊ नये म्हणून योजनेचा लाभ मिळविण्याची पद्धतीही सोपीच ठेवण्यात आली. मात्र, समाजातील काही बेरकी लोकांनी याही योजनेवर आपली वक्रदृष्टी फिरविली. वशिलेबाजी करून धनसंपन्न असतानाही या योजनेचे अनेक जण लाभार्थी झाले. साहजिकच शासनाची तर फसवणूक झालीच; मात्र बोगस लाभार्थ्यांनी खऱ्या लाभार्थ्यांच्या मानधनावरही डल्ला मारला आहे.

Web Title: The bogus benefici

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.