लोहारा एमआयडीसीत युवकाचा जळालेला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:37 IST2019-04-18T21:36:35+5:302019-04-18T21:37:28+5:30
शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या लोहारा एमआयडीसी परिसरात २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. जळालेला मृतदेह असल्याने घातपात घडविल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोहारा एमआयडीसीत युवकाचा जळालेला मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या लोहारा एमआयडीसी परिसरात २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. जळालेला मृतदेह असल्याने घातपात घडविल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
भूषण गंगाधर मेश्राम (२१) रा. मामानगरी असे या मृत युवकाचे नाव आहे. भूषण हा बुधवारी रात्री ९ वाजतापासून घरुन बेपत्ता होता. तो सायकल घेऊन निघून गेला. कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. त्याचे आई-वडील लोहारा पोलीस ठाण्यात मुलगा हरविल्याची तक्रार घेऊन आले होते. दरम्यान अवधूतवाडी ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील एका टेकड्यावर युवकाचा जळालेला मृतदेह असल्याची माहिती मिळाली. मृतदेह असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या ठाण्यांमध्ये मिसिंग तक्रार आहे काय, याची पडताळणी केली.
यावरून हा मृतदेह भूषणचा असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय त्याच्या आई-वडिलांनीही ओळख पटविली आहे. भूषणला नेमके कोणी जाळले, त्याची हत्या झाली की आत्महत्या आहे याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी कुठलाही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.