यवतमाळच्या भाजी मंडीत तरुणाचा निर्घृण खून
By Admin | Updated: July 4, 2016 02:04 IST2016-07-04T02:04:11+5:302016-07-04T02:04:11+5:30
दुकान गाळे मिळविण्याच्या वादात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाचा धारदार चाकुचे वार करून निर्घृण खून केल्याची घटना...

यवतमाळच्या भाजी मंडीत तरुणाचा निर्घृण खून
चाकूचे छातीवर वार : दुकानाचा वाद गेला विकोपाला, चौघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार
यवतमाळ : दुकान गाळे मिळविण्याच्या वादात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाचा धारदार चाकुचे वार करून निर्घृण खून केल्याची घटना येथील विठ्ठलवाडी परिसरातील भाजीमंडीत रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान घडली.
गोपाल मिश्रा (३५) रा. प्रभातनगर, यवतमाळ असे मृताचे नाव आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गोपालचा नवीन भाजीमंडीत दुकान घेण्यावरून वाद होता. शहरातील आठवडी बाजार परिसरात भाजीमंडी विठ्ठलवाडीतील कॉटन मार्केट यार्डमध्ये आली आहे. येथे दुकान क्रमांक नऊ मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेतूनच आरोपी पन्ना जयस्वाल, शेख अली उर्फ कवठ्या, जान्या ढाले, प्रशांत सालोडकर सर्व रा. तलावफैल या आरोपींनी लोखंडी रॉड आणि चाकुने हल्ला करून गोपालचा खून केला, अशी तक्रार गंगाधर रुद्रधर मिश्रा यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर करीत आहे.
आरोपींनी गोपाल मिश्रा याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. त्यानंतर त्याच्या छातीवर उजव्या बाजुने चाकुने भोसकण्यात आले. घटनास्थळावर झटापट झाल्यानंतर चाकु गोपालच्या छातीत तुटला. मुठ आरोपींच्या हातात आणि पाते गोपालच्या छातीत होते. सकाळी लिलाव सुरू असताना ही घटना झाल्याने मंडीत एकच खळबळ उडाली.
काही काळ येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेत गोपालला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. गोपालवर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)