वरोडीत धुऱ्याच्या वादात खून
By Admin | Updated: October 22, 2014 23:24 IST2014-10-22T23:24:01+5:302014-10-22T23:24:01+5:30
शेताच्या धुऱ्याच्या वादावरून एका शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना महागाव तालुक्यातील वरोडी येथे बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

वरोडीत धुऱ्याच्या वादात खून
शेतकऱ्यावर कुऱ्हाडीचे घाव : पाच आरोपींचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण
महागाव : शेताच्या धुऱ्याच्या वादावरून एका शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना महागाव तालुक्यातील वरोडी येथे बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. यातील पाच आरोपींनी महागाव पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले असून आरोपीत दोन भाऊ आणि चार मुलांचा समावेश आहे.
आत्माराम हिरा अडकिने (४५) रा. वरोडी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अडकिने नेहमीप्रमाणे शेतात ओलितासाठी बुधवारी सकाळी गेले. यावेळी शेजारील शेतकरी मस्के याच्यासोबत धुऱ्याचा वाद उफाळून आला. या वादात संभाराव आनंदराव मस्के, आनंदराव संभा मस्के, विलास संभाराव मस्के, हसन संभाराव मस्के, कुबेर संभाराव मस्के आणि सतीश आनंदराव मस्के यांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत कुऱ्हाडीचे घाव वर्मी बसल्याने आत्मारामचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनाही या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विन पाटील यांनीही घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान यातील संभाराव मस्के आणि त्यांच्या चार मुलांनी महागाव पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
अडकिने आणि मस्के यांच्यात २००८ पासून धुऱ्याचा वाद होता. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. तसेच आत्माराम अडकिने यांनी प्रशासनाच्या कानीही वाद घातला होत. तसेच न्याय मिळावे म्हणून महागाव तहसीलसमोर उपोषणही केले होते. मात्र या प्रकरणी कुणीच योग्य दखल घेतली नाही. परिणामी बुधवारी याचे पर्यावसान आत्मारामच्या खुनात झाले. (शहर प्रतिनिधी)