आंधळ्या जीवांची डोळस प्रेमकथा
By Admin | Updated: April 30, 2015 00:01 IST2015-04-30T00:01:52+5:302015-04-30T00:01:52+5:30
प्रेमात भावना बोलतात. नुसत्या स्पर्शाने माणूस ओळखता येतो अन्् अंगात बळही नसलं तरी प्रेमात बाजी मारता येते.

आंधळ्या जीवांची डोळस प्रेमकथा
एकाच विद्यालयाचे विद्यार्थी : नेर येथे सर्वांसमक्ष झाले शुभमंगल
किशोर वंजारी नेर
प्रेमात भावना बोलतात. नुसत्या स्पर्शाने माणूस ओळखता येतो अन्् अंगात बळही नसलं तरी प्रेमात बाजी मारता येते. अशाच दोन आंधळ्या जीवांनी आपल्या प्रेमासाठी वाटेल ते केले. शेवटी डोळस प्रेमकथेला आकार मिळाला. दारव्हा तालुक्यातील बागवाडी येथील आंधळा विलास कुंभेकर व नेर येथील वैशाली तातड हे दोन जीव एकत्र आले. आंतरजातीय या विवाहाला अखेर परिवारानेही स्वीकारले.
नेर येथील राजेंद्र तातड याची दोन्ही डोळ्यांनी अंध मुलगी व दारव्हा तालुक्यातील बागवाडी येथील पांडुरंग कुंभेकर यांचा मुलगा दोघे अमरावती येथील डॉ.नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथे शिकत होते. गेल्या एक वर्षापूर्वी दोघात प्रेमाचे अंकुर फुलले व दोघांनाही एकमेकांशिवाय करमेनासे झाले. सोबत जगण्यामरणाच्या शपथाही घेतल्या. मात्र या विवाहाला दोन्हीही परिवाराचा विरोध होता. एकतर दोघांचीही जात वेगवेगळी असल्याने हा विवाह दोन्ही परिवाराला पसंत नव्हता. अखेर वैशाली आणि विलासला सुट्या लागल्याने दोघेही आपआपल्या घरी गेले. मात्र विलास बागवाडीवरून वैशालीच्या घरी येऊन तिच्या पित्याला लग्नासाठी परवानगी मागत होता. वैशालीचे वडील राजेंद्र तातड यांची या विवाहाला होकार होता. विलासच्या परिवाराला हा विवाह मान्य नव्हता. अखेर या विरोधाला झुगारून विलास आणि वैशाली पळून गेले. या घटनेची फिर्याद वैशालीच्या वडिलाने नेर पोलिसात केली. अखेर पोलिसांनी विलासशी संपर्क करून पोलीस ठाण्याला बोलावले. सर्वासमक्ष दोघांनीही सोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही विवाह योग्य असल्याने पोलिसांनी दोन्ही परिवाराची समजूत घातली. बजरंग दलाचे मधुकर खंडागळे, मोहन पापळकर, शुभम माहूरकर, मुकेश मेश्राम, प्रशांत घरडे, संदीप शेडमाके, शुभम जयसिंगपुरे, बंडू बोरकर, संजय दारव्हटकर, वंदना मिसळे यांनी पुढाकार घेतला.