राळेगावात प्रस्थापितांविरुद्धच्या असंतोषाचा स्फोट

By Admin | Updated: October 19, 2014 23:18 IST2014-10-19T23:18:58+5:302014-10-19T23:18:58+5:30

राळेगाव विधानसभा मतदारसंघात प्रा. वसंत पुरकेविरुद्धच्या जबर असंतोषाचा स्फोट झाला आहे. या मतदारसंघाचे २० वर्षांपर्यंत सलग प्रतिनिधित्व करणारे प्रा. पुरके यांचा पराभव त्यांचेच गत तीन

Blast of dissent against Rathore | राळेगावात प्रस्थापितांविरुद्धच्या असंतोषाचा स्फोट

राळेगावात प्रस्थापितांविरुद्धच्या असंतोषाचा स्फोट

के.एस. वर्मा ल्ल राळेगाव
राळेगाव विधानसभा मतदारसंघात प्रा. वसंत पुरकेविरुद्धच्या जबर असंतोषाचा स्फोट झाला आहे. या मतदारसंघाचे २० वर्षांपर्यंत सलग प्रतिनिधित्व करणारे प्रा. पुरके यांचा पराभव त्यांचेच गत तीन निवडणुकीत प्रतिस्पर्धी राहिलेले प्रा.डॉ. अशोक उईके यांनी तब्बल ३८ हजार ७५० मतांनी पराभव केला. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी गेल्या दोन निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले.
प्रा. पुरके यांचे राजकारणातील सर्व विरोधी पक्षाचे नेते, कार्यकर्ते, मतदार एवढेच नव्हे तर त्यांच्याच काँग्रेसमधील असंतुष्टांनी एकजूट करून सर्व जुना हिशेब चुकता केला. पुरकेंना पराभूत करायचेच या भावनेने सर्व शक्ती पणाला लावली. मात्र २००९ च्या निवडणुकीत दगा करणाऱ्यांनाही या निवडणुकीत धडा देण्यात उईके यशस्वी ठरले.
सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. उईके यांना २२४ तर पुरके यांना ११५ मते बॅलेट पेपरमध्ये मिळाल्याचे दिसल्याने नोकरदारवर्गही भाजपासोबत असल्याचे दिसून येत आघाडीची सुरुवात झाली. बाभूळगाव तालुक्यातील इव्हीएमची मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीतच दोन हजार २८६ मतांची आघाडी भाजपला मिळाली. यानंतर बाभूळगावच्या सहा, कळंबच्या सात, राळेगावच्या आठ, रूंझा महसूल सर्कलच्या चार याप्रमाणे २५ फेऱ्यांपर्यंत सतत आघाडी कायम वाढतच राहिली. दुपारी २ वाजता या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मोहन जोशी, निवडणूक विभागाचे निरीक्षक टी.कैथिरेसन, सहायक योगेश लाखाणी, तहसीलदार सुरेश कव्हळे आदींनी प्रा. अशोक उईके यांना विजयाचे प्रमाणपत्र बहाल केले.
सकाळच्या पहिल्या फेरीपासून विजयाची चाहुल लागताच भाजप-महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलाल-नीळ उधळून आनंद व्यक्त केला. फटाके फोडणे सुरू केले. ढोलताशाच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गांवरून विजयी मिरवणूक काढण्यात आली.
या मतदारसंघात भाजप नेत्यांच्या झालेल्या सभा आदी कारणांमुळे हा परिसर भाजपला अनुकूल झाला. पाच वर्षांत भाजपने या मतदारसंघात संघटनेचे जाळे कुशलतेने विणले. विविध समाजाच्या लोकांना पक्षाकडे वळविण्यात भाजपच्या वरिष्ठांना यश आले. एकनिष्ठ कार्यकर्ते, नेते आदी बाबींमुळे प्रा. उईके यांचा विजय सुकर झाल्याचे यावेळी दिसून आले.
प्रा. पुरके यांचे मात्र या निवडणुकीत कवडीचेही सुयोग्य नियोजन नव्हते. जुन्या, एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली. धड एक मोठी सभाही ते आयोजित करू शकले नाही. याशिवाय बेंबळा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आदी बाबींकडे दुर्लक्ष केल्यानेही प्रा. पुरके यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या दोन टर्मच्या तुलनेत शेवटच्या दोन टर्ममध्ये पुरके यांचे या मतदारसंघाकडे बरेच दुर्लक्ष झाले होते.

Web Title: Blast of dissent against Rathore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.