भाजपाचे अहीर यांची हॅट्ट्रिक
By Admin | Updated: May 17, 2014 00:32 IST2014-05-17T00:32:45+5:302014-05-17T00:32:45+5:30
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी आज शुक्रवारी उद्योग भवनात पार पडली. यात भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी विजयाची हॅट्ट्रिक करीत

भाजपाचे अहीर यांची हॅट्ट्रिक
वणी : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी आज शुक्रवारी उद्योग भवनात पार पडली. यात भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी विजयाची हॅट्ट्रिक करीत विद्यमान पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांचा दोन लाख ३६ हजार २६९ मतांनी दारून पराभव केला. अंतर्गत गटबाजीची काँग्रेसला बसलेली ही चपराक पुढील राजकारणासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी आघाडी घेतली होती. अंतिम फेरीपर्यंंत ती सातत्याने कायम राहिली. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या १७ लाख ५२ हजार ६१५ होती. यापैकी ११ लाख ८ हजार ५७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीत हंसराज अहीर यांना पाच लाख ८ हजार ४९ एवढी मते पडली तर काँग्रेसचे संजय देवतळे यांनी दोन लाख ७१ हजार ७८0 मते घेतली. पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे नेत व आपचे उमेदवार अँड. वामनराव चटप यांना दोन लाख चार हजार ४१३ एवढय़ा मतांवरच समाधान मानावे लागले. त्यापाठोपाठ बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हंसराज कुंभारे हे ४९ हजार २२९ एवढी मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी १५ उमेदवारांची डिपाझीट जप्त झाली. यात बसपाचे हंसराज कुंभारे यांच्यासह अशोक खंडाळे (रिपाइं), कुरेशी म. इखलाख म. युसूफ, रोशन घायवन (रिपब्लिकन पक्ष खोरीपा), नितीन वसंतराव पोहाणे, नंदकिशोर गंगाराम रंगारी, पंकजकुमार शर्मा (तृणमुल काँग्रेस), फिरोज उस्मान खान पठाण, सिध्दार्थ रमेशचंद्र राऊत, अतुल अशोक मुनगीनवार, कार्तिक गजानन कोडापे, नामदेव माणिकराव शेडमाके, प्रमोद मंगरुजी सोरते, विनोद दिनानाथ मेश्राम, संजय निलकंठ गावंडे यांचा समावेश आहे. येथील उद्योग भवनात मतमोजणी केली जाणार असल्याने आज सकाळी ७.३0 वाजपासून नागरिकांची बसस्थानक व उद्योगभवन परिसरात गर्दी होऊ लागली. मात्र सकाळी ८.३0 वाजेपर्यंंत जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी मतमोजणीला सुरुवातही केलेली नव्हती. त्यामुळे उत्सुक नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. वणी, आर्णीमध्ये आघाडी महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी-पांढरकवडा विधानसभा मतदार संघातही निर्णायक आघाडी घेतली. वणी विधानसभा मतदार संघात ९२ हजार १0८ तर संजय देवतळे यांना ३८ हजार २६0 मते प्राप्त झाली. त्याप्रमाणे आर्णी विधानसभा मतदार संघात तब्बल एक लाख १0 हजार ७४५ तर देवतळे यांना ५0 हजार ९३१ मते मिळाली. वणी विधानसभा मतदार संघातून अहीर यांनी काँग्रेसचे उमेदवार यांच्यावर तब्बल ५३ हजार ८४८ हजार मतांची आघाडी घेतली. त्याचप्रमाणे आर्णी विधानसभा मतदार संघातून तब्बल ५९ हजार ८१४ मतांची आघाडी प्राप्त केली. त्यामुळे अहीर यांना विजयाची हॅटट्रीक करण्याची संधी प्राप्त झाली. सन २00९ च्या लोकसभा निवडणुकीत आर्णी मतदार संघातून अहीर यांना केवळ एक हजारांच्यावर मतांची आघाडी होती. तर वणी विधानसभा मतदार संघातून त्यावेळी काँग्रेसचे नरेश पुगलिया यांना एक हजार मतांच्या जवळपास आघाडी होती. यावेळी मात्र मोदी लाटेमुळे अहीर यांना या दोनही मतदार संघातून तब्बल ५0 हजारांच्या वर आघाडी घेतली. (कार्यालय प्रतिनिधी)