जिल्ह्यात भाजपाचे उघडणार पुन्हा खाते
By Admin | Updated: October 18, 2014 23:01 IST2014-10-18T23:01:03+5:302014-10-18T23:01:03+5:30
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी होत आहे. मात्र त्यापूर्वीच कोण निवडून येणार, कोण पडणार याचे अंदाज वर्तविले जात आहे. प्रत्येक जण आपला अंदाज खरा ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे.

जिल्ह्यात भाजपाचे उघडणार पुन्हा खाते
विधानसभा : काँग्रेसच्या जागांवर गंडांतर
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी होत आहे. मात्र त्यापूर्वीच कोण निवडून येणार, कोण पडणार याचे अंदाज वर्तविले जात आहे. प्रत्येक जण आपला अंदाज खरा ठरविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या तमाम अंदाजांचा फुगा अवघ्या २४ तासात फुटणार आहे. यावेळी जिल्ह्यात भाजपाचे खाते उघडण्याचा आणि त्याचा फटका काँग्रेसला बसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा आहेत. त्यापैकी पाच जागा काँग्रेसकडे तर राष्ट्रवादी व शिवसेनेकडे प्रत्येकी एक जागा आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीतसुद्धा काँग्रेसने आपल्याकडील जागा कायम राखली. या विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसला आपल्या सर्व जागा कायम राखता येतात की नाही, याबाबत साशंकता आहे. उमरखेड, यवतमाळ, राळेगाव, आर्णी, वणी या जागा काँग्रेसकडे आहेत. मात्र त्यापैकी किमान दोन जागा काँग्रेसच्या हातून जाण्याची चिन्हे दिसत आहे. काही राजकीय तज्ज्ञांच्या अंदाजानुसार तर काँग्रेसची पाच पैकी एखादी जागा कायम राहील. या जागांवर विरोधी पक्षाचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज आहे. यावेळी २००४ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
शिवसेना व राष्ट्रवादीला आपली जागा कायम राखण्यात यश मिळेल, असा अंदाज आहे. मात्र उर्वरित जागांवर आपली संख्या या दोनही पक्षांना वाढविता येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावेळी काँग्रेसमध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र मरगळ दिसून आली. स्टार प्रचारकांच्या सभा नाहीत की, नेत्यांमध्ये प्रचाराचा उत्साह नाही. प्रत्येक जण केवळ आपआपले गणित जमविण्यात व्यस्त दिसले. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदा यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीशिवाय विधानसभा निवडणुकीला सामोेरे गेल्याचे विदारक चित्र पहायला मिळाले. काँग्रेसला जिल्ह्यात केवळ एकमेव सेनापती होते, तेही स्वत: निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. काँग्रेसच्या फौजेचा पत्ताच नव्हता. अशाही वातावरणात काँग्रेसच्या एखाद दोन जागा कायम राहिल्यास आश्चर्यच मानावे लागेल.
गेली पाच वर्ष भाजपाचा एकही आमदार जिल्ह्यात नव्हता. यावेळी मात्र भाजपा खाते उघडणार असे वातावरण दिसू लागले आहे. एवढेच नव्हे तर राज्यात भाजपाची सत्ता येण्याची चिन्हे एक्झीट पोलच्या अंदाजानुसार दिसू लागताच जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याबाबतही तर्क लावले जात आहे. कॅबिनेट मिळणार की राज्यमंत्री पद, कुणाला मिळणार, मिळाल्यास कोणते खाते मिळणार, ले-आऊटचा अनुभव लक्षात घेता नगरविकास खात्यावर दावा सांगावा, इथपर्यंत भाजपा कार्यकर्त्यांचे अंदाज आणि आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. रविवारी सकाळी ८ वाजतापासून सातही मतदारसंघात मतमोजणी सुरू होणार असून दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. निकालासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)